Sunday, July 6, 2025

" चिमुरडी आणि फुटाणे "


 

दि.०५.०७.२०२५.

नमस्कार मंडळी कसे आहात, मजेतच असणार, असो काही तरी सुरुवात करायची म्हणून आपले नेहमीचे वाक्य वापरले, बऱ्याच महिन्याने लिहिणे होतंय, कधी कधी रोजच्या रहाट गाडग्यात असे काही अडकून जातो की बऱ्याच गोष्टी आपण करत होतो ते विसरून जायला होते..


पण आज असे काही बघितले की ते लिहिल्या शिवाय शांत वाटले नसते,म्हणून लगेच लिहायला घेतले.


आज शनिवार,नेहमीप्रमाणे श्री शनी मंदिरात दर्शनाला गेलो होतो, दर्शन घेऊन बाहेर आलो, नुकताच पाऊस पडून गेलेला,रस्त्यावर छोटे छोटे पाण्याचे डबके तयार झाले होते.सिमेंटच्या रस्त्यामुळे त्या डबक्यातले पाणी दिसायला स्वच्छ दिसत होते, त्यातल्या एका छोट्या डबक्याजवळ एक चिमुरडी खेळत होती,सहज त्या चिमुरडी कडे लक्ष गेले तिच्या हातात फुटाणे होते २/४ दाणे असावेत, बराच वेळ हातात राहिल्याने ते थोडे मळकट झाले होते, तिने एकदा हातातल्या फुटाण्या कडे पाहिले मग त्या डबक्याकडे आणि सरळ ते फुटाणे त्या डबक्यात टाकून दिले,छोट्याश्या हातानी त्या पाण्यात फुटणे चोळून स्वच्छ केले,परत त्या फुटाण्याचा पिवळा रंग दिसल्याबरोबर त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर जे हसू आणि समाधान दिसले ते शब्दात व्यक्त करणे शक्य नाही, पण मला प्रश्न हा पडला की ते फुटाणे तिच्या लेखी तर स्वच्छ झाले पण ते आता खाण्या योग्य राहिले का? किती लोक त्या रस्त्यावरून गेले असतील,किती कार,बाईक गेल्या असतील,ते पाणी किती अस्वच्छ असेल? असे किती तरी प्रश्न माझ्या मनात त्या २/५ मिनिटात येऊन गेले,पण ती चिमुरडी मात्र तिचे फुटाणे स्वच्छ झाले म्हणून जाम खुश झाली होती तिला ह्यातला एक पण प्रश्न पडला नव्हता,आणि तिने ते खायसाठी तोंडांत पण टाकून झाले होते. 

ह्या छोट्या घटनेने माझ्या डोक्यात विचारांचे चक्र मात्र सुरू झाले, आयुष्य जगताना आज जे काही घडले तसे काही बाबतीत आपणही असाच सारासार विचार न करता काही निर्णय घेतले आणि पुढे गेलो तर काय हरकत आहे, जे काय होईल ते होईल पुढे. त्या मुलीने ते फुटाणे खाल्ले,ते मुळीच खाण्या योग्य नव्हते, तिला आज न उद्या त्रास होणारच, पण तो लगेच होईल असे काही नाही किंवा शक्यता ही पण असेल की लगेच ही होऊ शकेल. पण त्या मुलीने तो कोणताच विचार केला नाही ती तिचा आजचा,आताचा क्षण जगलीये, तो आनंद तिने अनुभवला आणि घेतला हे जास्त महत्वाचे. जर हाच आणि असाच विचार आपणही केला तर आपणही असेच सुख किंवा आनंद अनुभवू शकू आपले आयुष्य जगताना. उगाच उद्या माझे कसे होईल रडत बसण्यात काय मजा आहे, हो की नाही... शेवटी आपले रोजचे जगणे हे ही एक रिस्क घेतल्या सारखेच तर आहे,रिस्क घेतल्याशिवाय कळणार कसे काय वाईट,काय चुकीचे...प्रत्येक गोष्टीचा उगाच जास्त विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाही, हो असे प्रत्येक गोष्टीत जमेलच किंवा लागू होईलच असे नाही, पण बराच ठिकाणी आपण हीच गोष्ट करू शकतो, त्याने तोटाच होईल असे काही नाही...

कधी - कधी बिनधास्त ,बेपर्वा जगण्यात मजा येते... हो की नाही?

आशुतोष दंडगव्हाळ....

4 comments:

  1. गोड गोष्ट ! उद्याची चिंता करून आजची मजा का घालवा?
    प्रवास म्हटला की चढ-उतार हे आलेच. छान लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना,कधी असेही जगायला हवे

      Delete
  2. खूपच छान लेख आणि अगदी बरोबर जास्त विचार करून जगण्या पेक्षा आजचा आताचा क्षण चा उपभोग घ्या आणि त्या लहान मुलीसारखेच निरागस राहून आयु ष्य जगा बस .

    ReplyDelete

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...