Saturday, October 30, 2021

"ताईचे घर"

दि.३०.१०.२१
" ताईचे घर "...
ताईचा संसार म्हणजे विंचवाच्या पाठीवरचे बिऱ्हाड म्हणता येईल,आज ह्या गावात तर दोन वर्षांनी दुसऱ्याच गावात.संसार तसा साधाच,खाऊन पिऊन सुखी,ना मागे काही उरणार ना उद्या साठी काही. पण जे होते त्यात सुख समाधान होते. आयुष्यात सगळ्याच गोष्टी कुठे मिळतात, एक असेल तर एक नाही. समर्थांनी म्हटलेच आहे ना " जगी सर्व सुखी असा कोण आहे,विचारे मना तूची शोधूनी पाहे". असो तर हा आपला काही विषय नाही,आपला विषय आहे ते ताईचे घर.
ताईचे घर कधी २ खोल्यांचे तर कधी ३ खोल्यांचे,कधी मिळालाच तर एकदम बंगला,तर कधी बंगल्याच्या गॅरेज मध्ये पण असलेले. कधी गुळगुळीत टाइल्स तर कधी शेणाची सारवण असलेली जमीन, कधी घरात पाणी,तर कधी मैलभर जाऊन पाणी आणायला लागायचे. कधी धो धो पाणी,तर कधी तांब्याभर पाणी सुद्धा विकत आणायला लागायचे. एकूण काय तर adjustment का काय म्हणतात ना त्याचे दुसरे नाव म्हणजे ताई आणि तिचे घर. तसे बघायला गेले तर नुसते घराच्या बाबतीतच काय,तिचे आयुष्यच एक adjustment आहे. प्रत्येक गोष्टीत तिला जुळऊन घेणेच नशिबी होते, आणि ते तिने विनातक्रार केलेही. तिला कधीच कुठल्याच गोष्टीची तक्रार नसायची, जे मिळाले ते ती स्वीकारून मोकळी व्हायची. हो पण जे मिळाले ते सुंदर आणि टापटीप मात्र तिनेच ठेवावे. कसेही घर मिळायचे ते ती इतक्या सुंदर पद्धतीने , टापटीपिने ठेवायची की घरी येणाऱ्या पाहुण्याला त्या घरात काही उणीव आहे हे समजायचे नाही, किंबहुना ती ते समजू द्यायची नाही,हे जास्त योग्य राहिल. तर अशी ही ताई आणि तिचे घर सदैव हसतमुख आणि घराचे दरवाजे चोवीस तास खुले येणाऱ्या जाणाऱ्या साठी.
ताईच्या घराचे वैशिष्ट हे की इथे न सांगता सवरता जरी कोणी आले तरी हसतमुख ताई आणि तिचे घर नेहमी स्वागतासाठी हजर असणार. अगदी रात्री बेरात्री आले तरी पुढच्या पंधराव्या मिनटाला गरमागरम जेवणाचे ताट येणाऱ्या समोर असायचे तेही हसऱ्या चेहऱ्याने आणि समोरच्याने न सांगता. ताईच्या घराला स्वतःचे असे काहीच नियम नव्हते किवां असले तरी ते येणाऱ्या पाहुण्यांसाठी कधीच नसायचे, पाहुण्यांना काय हवयं,त्यांना कसे पाहिजे,त्यांना काय आवडते त्यांच्या प्रमाणे ते ताईचे घर पाहुणे असेपर्यंत होऊन जायचे. आलेल्यांना सगळे सगळे द्यायसाठी,कुठे काही कमी नको ह्यासाठी ताईची खटपट असायची,स्वतः जमिनीवर झोपायची तयारी पण आलेल्यांना गादी मिळायला हवी. पाहुण्यांसाठी कुठलेच नियम ह्या घरात नव्हते, त्यामुळे प्रत्येक येणारा पाहुणा हा त्याला जसे वाटेल तसा राहू शकायचा,त्याला जे पाहिजे ते तो करू शकायचा,मनमोकळे राहू शकायचा. त्याला आपण दुसऱ्यांच्या घरी आहोत हे ह्या ताईच्या घरी कधीच जाणवायचे नाही,हे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य होते ताईच्या घराचे.
असे हे ताईचे घर आणि ताई. हे सगळे वाचून तुम्हाला पण असे कुठले घर आणि एखादी ताई नक्की आठवेल ह्याची मला नक्की खात्री आहे.
हो पण एक सांगायचे राहिले,ह्यातील जी ताई आहे ना तिला मात्र असे घर नाही मिळाले कधीच जिथे ती हक्काने जाऊन चार दिवस राहू शकेल तिला जसे वाटेल तसे,कुठलेही नियम नसणारे....

आशुतोष दंडगव्हाळ....

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...