Friday, November 25, 2022

" Walk a mile in my shoes "...


 दि.२४ नोव्हेंबर २०२२...

" Walk a mile in my shoes "......

तुम्हाला लेखाचे शीर्षक वाचून अंदाज आलाच असेल लेख कशावर असेल ह्याचा? शीर्षक मुद्दाम इंग्रजीतून घेतलेय,कधी कधी जलद परिणामा साठी इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो😜,हा झाला गमतीचा भाग,असो तर लेखा कडे वळू यात.

एखाद्याला समजून घ्यायचे असेल तर त्याचे सारखे किवां त्याचे आयुष्य जगायला हवे,असा साधारणसा त्या शीर्षकाचा अर्थ निघतो,पण पुढे अजून खोलात गेलो तर खूप मोठा अर्थ त्यात लपलाय. आपण नेहमी कोणांकोणाला त्याची बाजू समजून न घेता तो चूक किवां बरोबर ठरऊन मोकळे होतो,त्यावर मोठमोठ्याने चर्चा करून त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात  उभे करतो किवा अगदी निर्दोष माणूस ठरऊन मोकळे होतो,खरंच आपण हे बरोबर करतो काहो ?.. कधी आपण हा प्रश्न स्वतःला विचारायची हिम्मत दाखऊ शकू का? एखाद्या अमुकतमुक घटनेकडे बघताना आपण किती सहज पणें त्या घटने संबंधित व्यक्तीला न पाहता, न ओळखता,  तो/ती व्यक्ती जे वागला/वागली , त्या वेळेसची परिस्थिती काय होती,कशी होती,का होती, ह्याचा कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्या व्यक्तीला आरोपी वा निर्दोष ठरवणे कितपत योग्य? कधी स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेऊन ,त्यावेळेस आपण कसे वागलो असतो हे पाहण्याची तसदी आपण का घेत नाही? काय येवढी घाई झालेली असते आपल्याला समोरच्या चा न्यायनिवाडा करायचा?

समोर दिसतेय ते खरेच तसे आहे की त्याला दुसरीही काही बाजू आहे,हे पाहायला आजकाल कोणी तयारच नसतो,सरळ निष्कर्ष काढून मोकळे. साधे उदाहरण घ्यायचे झाले तर हा संवाद बघा, " अहो काय अमक्यातमक्याची मुलगी वेळ-काळ न बघता सारखी बाहेर उंडारत असते". झाले त्याचेबरोबर समोरचाही त्या मुलीबद्दल काहीतरी विचार करून तिला चुकीचे वागते ठप्पा मारून मोकळा होतो. आता इथे गंमत बघा, ती मुलगी कशाला बाहेर जाते,का बाहेर जावे लागते,ती काय करते बाहेर जाऊन,ह्या एकाही प्रश्नाचे उत्तर ह्या महाभागांकडे नसते,तरीही तिच्या वागण्यावर ताशेरे ओढून मोकळे. मग त्यातला एखादा कुतूहल म्हणून तिच्या अश्या बाहेर जायचे कारण शोधतो आणि मग खरे कारण समोर आल्यावर हीच सगळी मंडळी म्हणणार,अरे काय हिंमतवान मुलगी आहे, आई -वडील आजारी, घरातला खर्च,औषधपाण्या चा खर्च,कोणी मदतीला नसताना सगळे एकटीने सांभाळतिये,त्यासाठी बाहेर चार चार ठिकाणी नोकऱ्या करत वणवण फिरतीये,असे म्हणून हळहळणार. अरे बाबांनो मग हेच अगोदर का नाही केले? ह्या अगोदर तुमच्या बोलण्याचा तिला,तिच्या आई - वडलांना किती त्रास झाला असेल ह्याचा विचार आला का मनात?

अजून एक किस्सा बघा, एक काकू दुसऱ्या काकूंना सांगत असतात " अगं काय सांगू तुला, माझ्या ननंदेची मुलीं ने  पळून जाऊन लग्न केले,सगळ्या खानदानाचे नाक कापले पोरीने, आई - वडलांना बाहेर तोंड दाखवायला जागा ठेवली नाही कार्टिने ,आणि अजून बरेच काय काय, पण आमच्या ननंद बाईंनी काही एक न बोलता सगळे मुक्याट्याने समजून घेऊन,दोघांना माफ केले,आणि घरात घेतले,मी असते तर थोबाड फोडले असते पोरीचे,नाहीतर कापूनच टाकले असते". आता काही दिवसांनी ह्याच कापून टाकले असते म्हणणाऱ्या काकूंची मुलगी पळून गेलीय आणि निरोप पाठवलाय की आम्ही लग्न करतोय आणि इकडेच राहणार आहोत,काळजी करू नये. आता ह्या वर ह्या कापून टाकणाऱ्या काकूंची reaction बघा बरका, " अगं काय ह्या आजकालच्या मुलांपुढे आपले काही चालते का,पण हो,आमच्या सुलूने मुलगा भारी निवडलाय हो, चांगला कॉम्प्युटर इंजिनिअर आहे, आयटीत कामाला आहे" आहे की नाही गंमत. आता त्या ह्यांच्या ननंद बाईंच्या मुलिनेही असाच चांगला देखणा ,हुशार, चांगली नोकरी असणारा,तिच्याच फील्ड मधला मुलगा शोधलेला असतो. पण ह्या काकू त्यांचेबद्दल कश्या बोलतात आणि स्वतःच्या मुलीबद्दल कश्या react होतात, आहे की नाही गंमत..
असेच कितीतरी किस्से वेगवेगळ्या परिस्थितील सांगता येतील, आणि ती लिस्ट मारुतीच्या शेपटी सारखी न संपणारी असेल.

आपणही ह्या अश्याच परिस्थितीला कधीतरी सामोरे गेलो असतो, ह्या अश्या बोलण्याने समोरच्याला किती त्रास होतो हे ह्या अश्या वाचाळविर लोकांना कळत नाही,वेळच त्यांना बरोबर शिकवते.....

पण खरंच आपण हे वाक्य मनात कोरून ठेवायला हवे,कोणाबद्दल मत बनवताना हे वाक्य आठवले पाहिजे,हो की नाही? काय वाटते तुम्हाला?...

आशुतोष दंडगव्हाळ......

Monday, November 7, 2022

"ज़िन्दगी ख्वाब है"....!!!


 दि.०७/११/२२..


"ज़िन्दगी ख्वाब है"....!!!

परवा काही गाणे ऐकण्यात आले, विषय होता जीवन आणि स्वप्नं. प्रत्येक गाण्यात आयुष्याला / जीवनाला स्वप्नांशी जोडले होते, त्यातले एक " जागते रहो" चित्रपटातले होते, " जिंदगी ख्वाब है" ते गाणे ऐकल्यावर विचार आला खरंच की, आयुष्य म्हणजे स्वप्नच तर आहे, स्वप्नाशिवाय काय वेगळे असू शकेलं ?

आपण आपले आयुष्य आपल्या स्वप्नांच्या अवतीभोवती तर विणतो, त्या स्वप्नांना उराशी कवटाळून तर जगत असतो, सारखे ती पूर्ण कशी होतील ह्याच प्रयत्नात असतो, मग काय हरकतये म्हणायला, की जीवन म्हणजेच स्वप्नं, तुम्हाला काय वाटते...?

अगदी जन्मापासून विचार केला तर त्या बाळाची स्वप्नं काय, आईचे दूध मिळेल, छान पैकी आईच्या कुशीत झोपता येईल, सगळे लाड करतील, येवढे मिळाले की त्याचे जीवन पूर्ण आणि तृप्त.

थोडे मोठे झाले की खूप खाऊ,खूप खेळायला मिळणे,चांगली चांगली खेळणी ह्याशिवाय कुठली स्वप्नं पाहतो आपण,तेवढे मिळाले की मोठेपणी अगदी सगळ्यांना सांगतो माझे लहान पण खूप छान गेले. शेवटी काय तर प्रत्येक क्षण स्वप्नं पाहण्यात आणि ती पूर्ण करून घेण्यात किवां पूर्ण करण्यातच आपण असतो. शेवटी काय तर स्वप्नांवरच आपण जगतो.तेच आपले जीवन.

स्वप्नच तर असतात जी आयुष्याला रंगीत किवां बेरंग करतात, कधी रडवतात,कधी हसवतात, कधी पटकन पूर्ण होतात,कधी होता होता राहून जातात, त्यातूनच मग माणूस म्हणतो माझे आयुष्य सुंदर आहे / वाईट आहे. म्हणजे शेवटी काय तर स्वप्नच ठरवणार तुम्ही आनंदी राहणार की दुःखी.

दिलीप कुमार चे मधुमती मधले गाणे आठवते का, " टुटे हुये ख्वाबो ने हमको ये सिखाया हैं I दिल ने जीसे पाया था आखों ने गवाया है I " 

स्वप्नं बघायची आणि ती पूर्ण करायची,तरच आयुष्य रंगीत आणि सुखी होईल,नुसतीच उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणाऱ्या चे आयुष्य दुःखातच जाणार,हो की नाही.....


आशुतोष दंडगव्हाळ......



Sunday, September 18, 2022

" शालेय भाषण स्पर्धा "

 दि.१८/०९/२०२२..

भाषणे म्हटलं की लगेच शाळा आठवते, कारण बहुसंख्य जणांनी भाषणं ही शाळेतच केलेली असतात, मोठे झाल्यावर तोंड उघडायची संधी तशी खूपच कमी वेळेस मिळते.( मी माणसांची गोष्ट करतोय🤪 ). असो मजेचा भाग सोडा, मुद्दा हा की भाषण स्पर्धा म्हटले की सगळ्यांना शाळा आठवलीच पाहिजे, आणि शाळेतले आपले पाहिले भाषण, झालेली फजिती किंवा मिळालेली शाबासकी. पण ही शाबासकी फारच थोड्यांच्या नशिबात असायची, त्या नशीबवान लोकांमध्ये माझे नाव कधीच आले नाही ह्यासाठी हा लेखन प्रपंच.

तर हे आठवायचे कारण असे, माझेकडे लहान भावाची मुलगी (सद्ध्या ती तिसरीत शिकते)आलेली,माझी पुतणी, आल्या आल्या आशुकाका - आशु काका म्हणून मागे लागली,म्हटले काय, तर सांगायला लागली,"आमच्या शाळेत भाषण स्पर्धा आहे त्यात मी भाग घेतलाय, तुला म्हणून दाखऊ का माझे भाषण?" मी म्हटले हो दाखव की मज्जा एकदम. तिने पुढचे २-३ मिनिट इंग्रजीत भाषण म्हणून दाखवले, थोडे अडखळत, तिच्या मम्मीला विचारात काय ग मम्मी पुढे,असे करत ते भाषण संपवले. टिळकांवरचे ते भाषण होते पण इंग्रजीत असल्याने त्यात काही म्हणावा तेवढा जोश नव्हता, ह्यात त्या पोरीची चूक नाहीच ती इंग्रजी भाषाच अशी, त्याला ती बिचारी काय करणार, आणि दुसरे म्हणजे टिळकांवर च्या भाषणात " मी शेंगा खाल्ल्या नाही,मी टरफले उचलणार नाही...",हे वाक्य च गायब, दुसरे ते "स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,आणि तो मी मिळवणारच", हे ही नव्हते. कमाल आहे, ह्या दोन वाक्क्यां शिवाय टिळकां वरील भाषण पूर्णच होऊ शकणार नाही. घशाच्या नसा ताणून, आवाजात जोश आणून करायचे असे ते भाषण. असो पण त्या चिमुरडी ने, फर्ड्या इंग्लिश मध्ये भाषण केले. थोडे अडखळत, काही विसरलेले शब्दं अम्म अम्म करत, मग आईकडे मदतीच्या आशेने बघत,आईने पण लगेच prompting करत,एकदाचे ते भाषण संपले. पण छान जमलेले.

ह्या भाषण विसरण्याचा वा भाषणातील एखादे वाक्य किवा शब्दं म्हणा ऐनवेळी बेटा आठवतच नाही, आणि मग जी काही परिस्थिती होते ती खूपच विचित्र असते अहो. सगळे डोळे आपल्यावर असतात, किती वेगवेगळ्या प्रकारे ते डोळे पाहतात आपल्याकडे,ते आता लिहितानाही मला त्रास होतोय,जाऊदे नकोच त्याबद्दल लिहायला.तुम्ही पण ह्या परिस्थितीत तून नक्कीच गेला असाल, तेव्हा तुम्हाला कळलेच असेल,मला काय म्हणायचय ते, अगदी सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले असेल,हो की नाही😅😅....

मी मात्र ही परिस्थिती माझ्या प्रत्येक भाषणाच्या वेळी अनुभवली आहे, माझ्या आईला भाषणे लिहायला जाम आवडायचे,ती लिहायची पण खूप छान, पण तती भाषणे खूप मोठ - मोठी असायची,अगदी ५-६ पानांची, मग माझी वेळ यायची ती तेवढी पाने पाठ करायची आणि ऐनवेळी ती महत प्रयासाने आठवायची, आणि तुम्हाला सांगतो इथेच माशी शिंकायची. आई ८-१० वेळेस माझे कडून अगदी घोकून घ्यायची, अगदी जय्यत तयारी करून घ्यायची, मीपण भाषणाच्या दिवशी माझे नाव पुकारले की जोशात स्टेज वर जाऊन भाषण चालू करायचो, आणि मग थोडे भाषण झाले की तो जोश कुठल्या कुठे पळून जायचा आणि मग आमचा अम्म अम्म सुरू व्हायचे, मग सर म्हणायचे, बास दंडगव्हाळ आता,छान छान एकदम,पुढल्या वेळी नीट पाठ कर हो, बस खाली. मग भेदरलेल्या सश्या सारखे खाली मान घालून चुपचाप जागेवर येऊन घाम पुसत बसायचे. अगदी मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे😏😥😥😥.

मग अजून काही मुलांची भाषणे व्हायची टाळ्या वाजवत ते सगळे ऐकून घ्यायचे, मग भाषणाला उभे रहात ते प्रमुख पाहुणे, त्यांच्या हातात भाषणाचा भला मोठा कागद असायचा तो ते त्या podium वर व्यवस्थित लाऊन,चष्मा wagare साफसूफ करून भाषणाला सुरुवात करायचे.मुलांना मंचावर चांगले बोलता यायला हवे,त्यांनी ह्यासाठी मेहनत घ्यायला हवी, आणि अजून बरेच काही,आणि गंमत म्हणजे हे सगळे ते त्या कागदात पाहून सांगत. तिथेच माझे टाळके खराब होई. चौथी - पाच वितल्या मुलांना भाषणे पाठ करून म्हणून दाखवायची अट,त्यात कुठलीच सुट म्हणून नाही,आणि हे स्वतः येवढे मोठे असून ह्यांना भाषणाचा कागद समोर ठेवायची,त्यात पाहून भाषणाची मुभा,निव्वळ चालूपणा आहे हा...असे विचार त्यांचे भाषण संपे पर्यंत यायचे..

मला सांगा हे असे चुकीचे आहे की नाही? ठीक आहे लहान मुलांकडून तुम्ही पाठांतर करून घ्या,पण असा दुष्टपणा नका ना करू, सगळ्या मुलांसमोर किती मेल्याहून मेल्यासारखे होते, आणि मुलं मग वर्षभर त्यावरून चीडवायचे, तो त्रास वेगळा सहन करावा लागायचा.😏

तर असा हा भाषणाचा किस्सा, कोणा कोणाला त्यांचे शाळेतले पाहिले भाषण आणि त्यावेळचा अनुभव आठवला,नक्की सांगा....😊

आशुतोष दंडगव्हाळ....

Sunday, July 17, 2022

" सुरवंट"


दि.१७.०६.२०२२

फुलपाखरू !

छान किती दिसते ! फुलपाखरू

या वेलींवर ! फुलांबरोबर

गोड किती हसते ! फुलपाखरू

पंख चिमुकले ! निळेजांभळे

हलवूनी झुलते ! फुलपाखरू

डोळे बारीक ! करिती लुकलुक

गोल मणी जणु ते ! फुलपाखरू

मी धरू जाता ! येई न हाता

दूरच ते उडते ! फुलपाखरू

कवी- ग.हा. पाटील.

कवी ग.हा.पाटलांची ही कविता कोणा कोणाला आठवते...किती छान आणि अर्थपूर्ण कविता होती नाही का? अगदी समोर लक्ष लक्ष फुलपाखरं उडतायेत असे दृश्य डोळ्यासमोर उभे राहते,त्यांचे वेगवेगळे आकार,रंगसंगती,नक्षीकाम, भिरभिरत ह्या फुलावरून त्या फुलावर बागडतायेत कुठलेच आणि आजूबाजूचे काहीच भान न ठेवता.पण आपण फक्त त्या छान छान फुलपाखराला च बघतो, त्याचा जन्म कसा होतो ते आपण सोयीस्करपणे विसरून जातो,त्यात काही विशेष नाही म्हणा मानव स्वभावच तो, प्रसूतीच्या कळा कोण लक्षात ठेवतो म्हणा, हो की नाही..
सहज मनात आले तो सुरवंट काय विचार करत असेल स्वतःचे फुलपाखरा मध्ये रुपांतर होण्याबद्दल, खरंच त्याच्या मनात विचार येत असतील का, कि येवढ्या हाल अपेष्टा सहन करून अल्पष्या आयुष्यासाठी फुलपाखरू व्हावे का? की त्याच्या जीवनाची ती परिपूर्णता असेल,जी काहीही झाले तरी त्याला पार पाडावीच लागणार आहे,त्याच्या मनात असो वां नसो. असेही असू शकेल त्यालाही तेवढीच ओढ असेल, उत्सुकता असेल, हौस असेल, त्या फुलपाखरू बनल्या वर मिळणाऱ्या आयुष्याची.... माणसासारखे च....


माणूस नाही का लहान असतो तेव्हा, मोठे होण्या ची घाई असते. मोठे किती मजा करतात, लहान असताना केवढा त्रास,शाळेत जा,अभ्यास करा,परीक्षा द्या, वगैरे वगैरे, म्हणून मग त्यापेक्षा पटकन मोठे होऊन जाऊ असे वाटत असते, तसेच बहुतेक त्या सुरवंटाला वाटत असावे. आपण कसे प्लॅन्स बनवतो मोठे होऊन आपण हे करू ,ते करू, सगळ्यांना आनंद देऊ,सगळ्यांसाठी करू,त्यात स्वतः साठीचे पण प्लॅन्स असतातच की.. हो की नाही? असेच आणि किंबहुना हेच त्यालाही ( सुरवंटाला) वाटत असणार,तेही भविष्यातील रंगीबेरंगी स्वप्न उराशी बाळगून, त्या आनंदात स्वतःला त्या कोशात गुरफटून घेत असेल,एक सुंदर, मनमोहक फुलपाखरू बनायला,आपले आयुष्य पूर्णत्वाकडे न्यायला...


मग काही दिवसांनी फुलपाखरू बनल्यावर त्याचा आनंद कोण गगनात मावेनासा होतो,सगळे आकाश कवेत घ्याय साठी उंच भरारी घ्यायसाठी मन नुसते उचंबळून येते, काय करू आणि काय नाही असे होते, हे करू का ते करू,इथे जाऊ का तिथे जाऊ,हे बघू का ते बघू... नुसते नुसते भिरभिरत राहते,आनंदाला उधाण येते, आपल्या अंगावरच्या नक्षीकामाने आणि असंख्य रंगसंगती ने  समोरच्याला मंत्रमुग्ध करून सोडते, सगळ्यांना हवेहवसे होते, सगळ्यांनाच ते आपल्या जवळ असावे असे वाटते, फुलं त्याला आकर्षित करतात,ये माझ्याकडे ये,माझे मधू खूप गोड आहे,बघ ये माझेकडे,ते वेडे जातेपण, हो पण त्याला हे कळत नाही की त्यात फुलाचा स्वार्थच जास्त असतो,कारण ह्याच्या पायाला त्या फुलाचे परागकण लागून त्याची पुढे नवीन उत्पत्ती होणार असते,हे त्या फुलझाडाला पक्के ठाऊक असते,पण त्या वेड्या फुलपाखराला नसते,त्याला वाटते किती हे फूल छान आहे, आपल्याला गोड गोड मध खायला देतोय....आपलेही काहीसे असेच होते का हो........


फुलपाखरू एकदम खुश असते स्वतःच्या दिसण्याचा त्याला भयंकर अभिमान वाटतो,त्याच खुशीत तो पुढे त्याच्या आयुष्यात काय लिहिलंय त्याकडे बघतच नाही,बहुतेक त्याचे लक्षच जात नसावे... आणि मग एके दिवशी कोणाच्या आणि कुठल्या तरी जाळीत अडकून ते कोणाच्यातरी स्पेसिमन बुक मध्ये चिटकलेले असते,त्याच्या अंगावरची नक्षी,रंगसंगती हळूहळू त्या वहीच्या पानावर विखरून जाते....आणि.......


माणसाचे आयुष्य आणि त्या फुलपाखराचे आयुष्य सारखे वाटते का, मला तर खूप same to same वाटते......


हे चांगले का वाईट हा ज्याचा त्याचा प्रश्न,आणि ज्याचे त्याचे उत्तर.....


तुमचे प्रश्न आणि उत्तरे वाचायला नक्की आवडेल, सांगा तर मग.....


आशुतोष दंडगव्हाळ....


" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...