Saturday, May 30, 2026

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६...

आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत…

फोनमध्ये contacts वाढले,

social media वर followers वाढले,

गप्पा वाढल्या,

status वाढले…

पण मनाने जोडलेली माणसं मात्र कमी होत गेली…

कारण आता नात्यांमध्ये प्रेमापेक्षा “सोय” जास्त दिसते…

आणि त्या सोयीसाठी प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात

एक असा माणूस हवा असतो…

जो कायम त्यांच्या मनासारखा वागेल…

एक “जोकऱ”…

जो स्वतःच्या भावना बाजूला ठेवून

समोरच्याला हसवत राहील…

समोरच्याचं दुःख समजून घेईल…

त्याच्या प्रत्येक mood ला सांभाळेल…

त्याच्या चुका माफ करेल…

त्याच्या रागालाही प्रेम समजेल…

पण स्वतःचं मन?

स्वतःच्या वेदना?

स्वतःच्या अपेक्षा?

त्यासाठी कुणाकडेच वेळ नसतो…

लोकांना असा माणूस हवा असतो

जो त्यांच्यासाठी २४ तास available असेल…

त्यांनी message केला की लगेच reply देईल…

फोन केला की सगळं बाजूला ठेवून बोलेल…

त्यांच्या प्रत्येक अडचणीत धावत येईल…

पण जेव्हा त्यालाच कोणाची गरज असते,

तेव्हा मात्र त्याच्यासाठी

“मी busy होतो…”

“नंतर बोलू…”

“तू खूप emotional होतोस…”

इतकंच उरतं…

हळूहळू तो माणूस समजून जातो

की त्याची किंमत

त्याच्या मनासाठी नाही…

तर तो किती सहन करू शकतो यासाठी आहे…

तो किती वेळा स्वतःला दुखावूनही

समोरच्याला हसवू शकतो…

तो किती वेळा ignore होऊनही

पुन्हा तसाच प्रेमाने बोलू शकतो…

तो किती वेळा तुटूनही

“मी ठीक आहे…”

हे खोटं हसून सांगू शकतो…

काही लोकांच्या आयुष्यात

असे लोक कायम असतात…

जे स्वतःपेक्षा दुसऱ्यांना जास्त जपतात…

दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा मारतात…

दुसऱ्यांच्या एका smile साठी

रात्रभर जागतात…

पण त्यांचं दुःख?

त्यांच्या डोळ्यातली झोप?

त्यांच्या मनातला थकवा?

तो कुणाला दिसत नाही…

कारण जगाला नेहमी

आनंदी चेहरा हवा असतो…

मनातल्या जखमा नाही…

आणि गंमत म्हणजे,

सगळ्यांना हसवणारा माणूसच

रात्री उशीमध्ये चेहरा लपवून

सर्वात जास्त रडत असतो…

तो कुणाकडे तक्रार करत नाही…

कारण त्याला माहीत असतं,

लोकांना त्याच्या भावना समजून घ्यायच्या नाहीत…

त्यांना फक्त तो

त्यांच्या मनासारखा हवा असतो…

नातं टिकवण्यासाठी

नेहमी एकाच व्यक्तीने adjust करत राहणं,

स्वतःला बदलत राहणं,

स्वतःच्या भावना दाबत राहणं…

हे प्रेम नसतं…

ती हळूहळू स्वतःला हरवण्याची प्रक्रिया असते…

आणि एक दिवस

तो “जोकऱ” शांत होतो…

बोलणं कमी करतो…

अपेक्षा ठेवणं बंद करतो…

कारण त्याला समजतं —

लोकांना खरं तर

भावना असलेला माणूस नको असतो…

त्यांना असा कुणीतरी हवा असतो

जो त्यांच्या आयुष्यात

फक्त हसवत राहील,

सांभाळत राहील,

समजून घेत राहील…

पण स्वतःचं मन मात्र

कधीच व्यक्त करणार नाही…

आणि म्हणूनच…

कधी कधी

सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा

“जोकऱ”च

आतून एकटाच राहतो…!

© 2026 | लेखनाधिकार : आशुतोष दंडगव्हाळ

विचार मांडणी ही वैयक्तिक असून अनधिकृत वापरास मनाई आहे.

Friday, May 15, 2026

" तुझसे नाराज नहीं,जिंदगी हैरान हुं मैं"....

 


दि.१५/०५/२०२६..

तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी… हैरान हूँ मैं” — आयुष्याच्या वेदनांना स्पर्श करणारे गाणे...

मासूम चित्रपटातील हे गाणे आठवते का?.... ह्यात आयुष्यावर राग नाही, पण आयुष्यातील गुंतागुंत, एकटेपणा आणि नात्यांमधील वेदना यामुळे मन गोंधळलेले आहे. माणूस परिस्थितीशी लढतोय, प्रश्न विचारतोय, पण तरीही आयुष्याशी नातं तोडत नाहीये, ते चांगले कसे जगता येईल हे बघतोय,तसा प्रयत्न करतोय,ती गुंतागुंत सोडवता येतीये का ते बघतोय..

या गाण्याची खरी ताकद म्हणजे त्यातला साधेपणा. कोणताही आक्रोश नाही, कोणतीही तक्रार नाही. फक्त शांतपणे आयुष्याला विचारलेला एक प्रश्न — “तू असा का आहेस?” आणि कदाचित म्हणूनच हे गीत प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जातं.

काही गाणी ही फक्त ऐकण्यासाठी नसतात, ती जगण्यासाठीच असतात. ती आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. त्यातलेच हे एक गाणे, आजही ऐकले की अगदी भरून येते. माणूस कितीही मजबूत असला, तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात काही न बोललेली दुःखं, काही अपूर्ण स्वप्नं, काही हरवलेली माणसं आणि काही न भरून येणाऱ्या जखमा कायम जिवंत असतात. आणि त्या तो कोपरा सोडून बाहेर आल्या की,अशा प्रत्येक क्षणी नकळत मनात उमटणारं गाणं म्हणजे " तुझसे नाराज नाही जिंदगी..." हो की नाही, असा कोणी सापडणार नाही,ज्याला ही गाणे आवडणार नाही किंवा ऐकल्यावर गलबलून येणार नाही, खरं सांगायचे हा अगदी..

हे गीत ऐकताना असं वाटतं, जणू एखादा माणूस स्वतःच्या आयुष्याशी शांतपणे संवाद साधतोय. कोणताही गोंधळ नाही, कोणतीही मोठी तक्रार नाही, कोणताही आक्रोश नाही. फक्त एक खोल वेदना आहे… आणि त्या वेदनेतून जन्मलेला एक साधा प्रश्न —

“मी तुझ्यावर रागावलेलो नाही रे आयुष्या… पण तू असा का आहेस,असा का वागतोस,इतकी कोणी परीक्षा घेतो का ते कोणी, हे मला समजत नाही.”

माणूस जेव्हा लहान असतो, तेव्हा त्याला आयुष्य म्हणजे आनंद, स्वप्नं, यश आणि प्रेम असं वाटतं. त्या वयात जग खूप सुंदर दिसतं. प्रत्येक नातं कायमचं वाटतं, प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल असं वाटतं. पण जसजसं वय वाढत जातं, तसं तसं आयुष्याचे खरे रंग दिसायला लागतात. काही लोक अचानक बदलतात, काही नाती नकळत तुटून जातात, काही स्वप्नं परिस्थितीच्या ओझ्याखाली गाडली जातात. आणि सर्वात जास्त वेदना तेव्हा होतात, जेव्हा आपण मनापासून जपलेल्या गोष्टी आपल्या हातातून हळूहळू निसटत जातात,स्वप्न तुटतात, हरवतात.

पण खरे सांगायचे तर आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे ते कधीच आपल्या मनासारखं चालत नाही. आपण खूप काही ठरवतो, योजना आखतो, मनात भविष्याची सुंदर चित्रं रंगवतो; पण आयुष्य अचानक वेगळंच वळण घेतं. काही क्षण असे येतात, जिथे माणूस पूर्णपणे तुटून जातो. बाहेरून तो हसत असतो, लोकांमध्ये वावरत असतो, जबाबदाऱ्या पार पाडत असतो; पण आतून मात्र तो शांतपणे कोसळत असतो.

कधी कधी दुःख इतकं खोल असतं की डोळ्यांत अश्रूही येत नाहीत. कारण काही वेदना रडून कमी होत नाहीत; त्या फक्त मनाच्या तळाशी जाऊन कायमच्या राहतात. हे गाणं त्या वेदनांना शब्द देतं. म्हणूनच ते ऐकताना प्रत्येकाला वाटतं — “हे गाणं माझ्यासाठीच लिहिलं गेलं आहे,माझेच गाणे आहे,म्हणून ते मनापासून आवडतं,कानाजवळ राहतं.”

आपल्या आयुष्यात काही माणसं अशीच असतात, ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो. त्यांच्यासाठी स्वतःचं सुख विसरतो, स्वतःला बदलतो, स्वतःच्या इच्छा मारतो. पण अनेकदा तीच माणसं आपल्याला सर्वात जास्त वेदना देऊन जातात. तेव्हा प्रश्न पडतो — चूक नेमकी कुणाची होती? आपल्या प्रेमाची? आपल्या अपेक्षांची? की नशिबाची? पण उत्तर कधीच मिळत नाही. फक्त मनात एक पोकळी तयार होते.

हे गाणं त्या पोकळीची जाणीव करून देतं. ते सांगतं की आयुष्य नेहमीच न्याय देत नाही,कधीकधी चांगल्या माणसांनाही दुःख मिळतं, प्रामाणिक माणसांनाही एकटेपणा मिळतो, आणि मनापासून प्रेम करणाऱ्यांनाही विरह मिळतो. तरीही माणूस जगत राहतो. कारण जगणं हा त्याचा स्वभाव असतो.

या गाण्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे त्यातील स्वीकार. यात कुठेही आयुष्यावर आरोप नाहीत. फक्त एक हळवी कबुली आहे —

“मी दुखावलो गेलो आहे… पण तरीही जगण्यावरच माझं प्रेम संपलेलं नाही,आशा संपलेल्या नाहीत, अपेक्षा अजूनही आहेत,तू जे माझ्यासाठी लिहितोयेस ते मी स्वीकारलय.”

काही वेळा आयुष्य आपल्याकडून खूप काही हिरावून घेतं. जवळची माणसं दूर जातात, परिस्थिती बदलते, शरीर थकायला लागतं, मनाला आधार उरत नाही. अशा वेळी माणूस स्वतःलाच विचारतो — “मी इतका प्रयत्न करूनही रिकामाच,एकटाच का राहिलो?” पण त्यावर आयुष्याचं उत्तर असतं — प्रत्येक गोष्ट मिळण्यासाठी नसते राजा; काही गोष्टी फक्त अनुभवण्यासाठी असतात.

हे गीत आपल्याला शिकवतं की वेदना टाळता येत नाहीत, पण त्या समजून घेता येतात. प्रत्येक तुटलेलं स्वप्न आपल्याला काहीतरी शिकवून जातं. प्रत्येक अपयश आपल्याला अधिक मजबूत बनवतं. प्रत्येक हरवलेलं नातं आपल्याला माणसांची खरी किंमत समजावून देतं.

आजच्या जगात प्रत्येक जण आतून कुठेतरी थकलेला आहे. कोणी पैशासाठी झगडतो आहे, कोणी नात्यांसाठी, कोणी स्वतःच्या अस्तित्वासाठी. लोक चेहऱ्यावर हसू ठेवतात, पण मनात मात्र हजारो वादळं चालू असतात. म्हणूनच हे गाणं आजही तितकंच जिवंत वाटते, आपलसं वाटते. कारण काळ बदलला, माणसं बदलली, परिस्थिती बदलली… पण माणसाच्या मनातील वेदना मात्र तशाच राहिल्या,त्या बदलल्या नाहीत, काळ जशा होत्या,आजही तश्याच आणि त्याच आहेत.

शेवटी आयुष्य हे कधीच पूर्णपणे समजत नाही. ते कधी आनंद देतं, कधी दुःख देतं, कधी अचानक रडवतं, तर कधी नकळत हसवतं. पण या सगळ्यात एक गोष्ट कायम राहते — माणसाची जगण्याची इच्छा,आशा,अपेक्षा..हो की नाही?

आणि म्हणूनच हे गाणं ऐकताना मन नकळत शांत होतं. कारण ते आपल्याला सांगतं कि तू काही एकटा नाहीस.तुझ्यासारखे हजारो लोक आहेत, जे ह्याच परिस्थितीतून जातायेत,ती सगळी माणसे आयुष्यावर रागावलेले नाहीत… तर आश्चर्यचकित आहेत, थोडेसे हरवलेले आहेत…थोडेसे थकलेले आहेत…आणि शांतपणे आयुष्याला म्हणतायेत -“तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी…हैरान हूँ मैं…”

हे अमर गाणे गुलजारसाहेब ह्यांनी लिहिलंय, त्यांच्या लेखनाची खासियत म्हणजे "साध्या शब्दांत अतिशय खोल भावना व्यक्त करणं." म्हणूनच हे गाणं आजही प्रत्येकाच्या मनाला भिडतं.

ही गाणे ऐकून तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा...

© 2026 | लेखनाधिकार : आशुतोष दंडगव्हाळ

विचार मांडणी ही वैयक्तिक असून अनधिकृत वापरास मनाई आहे.

Sunday, May 3, 2026

" मेरा नाम जोकर - राजु."

दि. ३०.०४.२०
" मेरा नाम जोकर " - राजु.
राज कपूर चा एक गाजलेला चित्रपट, आपल्याकडे चालला नाही,का नाही चालला ते एक कोडेच आहे. चित्रपट मोठा होता, पण कंटाळवाणा होता असे वाटत नाही, काही दृश्य त्यावेळेस च्या परिस्थिती नुसार धाडसी होती,पण तो चित्रपट न चालण्याचे एकमेव कारण असू शकेल असे वाटत नाही, कारणे काहीही असो राज कपूर सारख्या माणसाचा तो चित्रपट भारतात जादू दाखऊ शकला नाही, पण रशियात तो लोकांनी डोक्यावर घेतला,आजही भारत म्हटले की रशियन मेरा नाम जोकर आणि राज कपूर ची आठवण काढतात. माझे म्हणाल तर,मला हा चित्रपट खरंच खूप आवडला,त्याला खूप कारणं आहेत. म्हणून त्यावर लिहावं असे वाटले म्हणून ही येवढी प्रस्तावना... जरा मोठीच झालिये,पण त्याशिवाय पुढे जावेसेच वाटेना...
थोडक्यात ह्या चित्रपटाची कथा अशी,ह्यातले प्रमुख पात्र " राजु ". हा मुलगा गरीब घरातला, वडील सर्कस मध्ये, स्टंट करताना वारलेले, त्यामुळे आईला सर्कस,त्यातल्या नोकरीची कमालीची चीड आणि भीती, म्हणून ही आई काबाड कष्ट करून राजुला वाढवत असते,त्याला शपथ घालते की कधीही सर्कस किवा तिथली नोकरी नको.तिचे स्वप्न,मुलानी खूप शिकून मोठे व्हावे,चांगली नोकरी करावी,छान संसार करावा. साधे, सुटसुटीत, कोण्याही आईने आपल्या मुलांसाठी पहावे असे स्वप्न, आणि त्यात गैर ते काय असावे,आपण सगळेच अशीच स्वप्ने पाहत असतो स्वतःसाठी, मुलांसाठी,आणि ज्यांना हे सगळे जमते ते आदर्श वाटतात लोकांना, त्यांची उदाहरणे लोक देतात. तर असेच स्वप्न राजूची आई राजु साठी बघत असते,तर तिथे ह्या पठ्ठ्याचे स्वप्न काय तर ह्याला "जोकर" व्हायचे असते,लोकांना हसवायचे , त्यांची करमणूक करायची,आणि तो तसा प्रयत्नही करत असतो,शाळेत काय किवा बाहेर काय तो  सगळ्यांना हसवायचा प्रयत्न करत असतो. लोक त्याच्या गबाळेपणाला, धांद्रटपणाला,गरिबीला,त्याच्या कपड्यांना हसत असतात त्याची मजा उडवतात,त्याचा उपयोग करून घेतात,आणि काम झाले की हाकलून देतात. ते त्यांचे असे हसणे, वापरून घेणे हा मुलगा मजेत घेत असतो,त्याला त्याचे काहीही वाटत नाही,कारण त्याचे ध्येयच ते असते कि काहीही करून सगळ्यांना हसवायचे, एक उत्कृष्ट जोकर व्हायचे, ह्या बदल्यात त्याची कुठलीच अपेक्षा नाहीये,फक्त येवढेच की लोकांनी त्याला एक चांगला जोकर म्हणून ओळखावे...हा राजु शेवटपर्यंत हाच प्रयत्न करत असतो मध्ये मध्ये त्याच्या आयुष्यात सुखाचे क्षणही येतात,पण कोणी न कोणी ते काही काही कारणे देत त्याचेपासुन हिरावून घेतात,एक आई असते तीपण सोडून जाते, चित्रपट पाहताना सारखे वाटत राहाते की जगात लोक दुसऱ्यांचा पायरी म्हणून इतका कसा उपयोग करून घेत असतील, समोरच्याला भावनाच नाहीत का, असे त्याचेशी वागु कसे शकतात, की त्या माणसाचे दुर्दैव,चूकी की त्यानी लोकांच्या हसण्यात स्वतःचे सुख शोधले,इतके प्रश्न निर्माण होतात आणि मग मन खूप उदास होते....
खरे सांगा, असा एखादा राजु तुमच्या आजू - बाजूला तुम्हाला दिसला असेलच, किवां कधी तरी तुमचाच राजु झाला असेल,तुम्ही पण असेच सगळ्यांची मनं सांभाळत आला असाल पण तुमक्या मनाचा कधीच कोणी विचारही केला नसेल,तुम्हाला काय आवडतं,काय नाही आवडत ह्याचा जरा सुद्धा विचार केला नसेल,फक्त आणि फक्त तुम्हाला वापरत आले असतील,आणि काम झाल्यावर खड्यासारखे तुम्हाला बाजूला केले असेल, ही अशी परिस्थिती कधी कधी प्रत्येकाच्याच वाट्याला आली असेल,अनुभवली असेल,त्यावेळेस तुम्हाला कसे वाटले असेल? आपण कधीतरी ह्या अश्या परस्थिती तून गेलो तरी सगळ्यांचा राग येतो,तिथे आपण लगेच बदलतो चांगुलपणा कमी करतो.
पण काहिंचे नशीब ह्या राजु सारखे असते, ते आयुष्यभर दुसऱ्याला आनंदी ठेवायचा प्रयत्न करतात,त्यासाठी स्वतःचे आयुष्य,पैसा,भावना,स्वाभिमान सगळे सगळे देतात,समोरचा त्यांना फक्त ओरबाडत असतो,ते सगळे कळूनही हे सतत देत राहतात. स्वतः त्यांना ह्या बदल्यात कधीच काहीच मिळत नाही,साधे दोन प्रेमाचे शब्द सुद्धा ह्या माणसाच्या नशिबी नसतात,इतके दुर्दैवी कोणी असू शकते का, देवानी काहीच लिहिले नसेल का ह्यांच्या नशिबी? त्यांचे कपाळ असे कोरे ठेऊन का बरे पाठवले असेल देवाने त्यांना? स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेऊन दुसऱ्यांना हसवणे,दुसऱ्यांसाठी आनंद शोधणे, समोरच्याला देत राहाणे खरच खुप अवघड असते.. आजकालच्या जगात अशी वृत्ती सांभाळणे धोकादायक आहे,कारण इथे सगळे स्वतःसाठी जगणारे आहेत,पण त्यातही ( ही राजु सारखी माणसे) आशेचा किरण आहेतच की,म्हणून तर जग चालू आहे...
असे कितीतरी राजु ( दुसऱ्यांचा सुखात स्वतः विरघळून जाणारे) आज आपल्या आजूबाजूला आहेत म्हणून आपण जगतोय,  कधी आपण स्वतःच ( थोड्या वेळा करिता का होईना) राजु बनतोय म्हणून हे सगळे चालू आहे, नाहीतर आपण कधीच संपलेलो असतो.राजु एक वृत्ती आहे ती थोडेफार का होईना प्रत्येक माणसाने घ्यायलाच हवी, चला तर मग दोस्तहो आज पण करूया ह्या राजुला ( ह्या वृत्तीला) तुमच्या आमच्यात जपण्याचा.......
आशुतोष दंडगव्हाळ...

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...