Sunday, December 16, 2018

" श्रेष्ठ गुरु - मानवी मन "

मानवी मन - श्रेष्ठ गुरु....
गुरु, आपले आयुष्य घडवणारे,योग्य दिशा दाखवणारे, योग्य - अयोग्य समजवणारे,आणि असे खूप काही. आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर भेटणारे,मार्गदर्शन करणारे, अगदी लहानपणापासून आयुष्य संपेपर्यंत कोणी ना कोणी गुरु बनून आपल्याला काही तरी शिकवत असतात, मार्गदर्शन करत असतात. लहानपणी आजी - आजोबा, नंतर बालवाडी तले गुरु, शाळेतले गुरु, महाविद्यालयातील गुरु, प्रत्यक्ष कामाच्या,नोकरीच्या ठिकाणचे गुरु,असे किती तरी ही यादी न संपणारी. अगदी खाणे - पिणे, राहाणे , समाजात कसे राहावे,घरात कसे राहावे हेपण सांगणारे,शिकवणारे गुरु,किती म्हणून मोजावे. तर असो ,असे हे आपले आयुष्य व्यापून असलेले गुरु मंडळी. ह्यांचेमुळेच आपले आयुष्य घडते किवां बिघडते असे आपण म्हणतो, बरेच प्रमाणात खरेही असते.
पण मला असे वाटते की ही सगळी गुरु मंडळी आपल्याला रस्ता दाखवतात, चांगले - वाईट ,खरे - खोटे हे शिकवतात. हो पण त्यावर चालायचे, ते खरेखोटे ,चांगले का वाईट हे समजून घेण्याचे जे काम असते ते आपल्यालाच करावे लागते, जे आपण आपल्या कुवतीप्रमाणे( बुध्दी म्हणा, परिस्थिती, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती,असे अजून बऱ्याच गोष्टी) आपण करत असतो,करतो.
हे सगळे गुरु प्रत्येकाला सारखीच शिकवण देत असतात, तिथे भेदभाव नसतो. तरीपण एक मुलगा साहेब एक शिपाई होतो असे का? शिकवण एक,चांगले काय वाईट काय ह्याचेही ज्ञान एकच दिले असते मग एक पोलिस आणि एक चोर कसा होतो? ह्या प्रश्नाला खूप उत्तरे असतील, आहेतही. पण मला वाटते ह्या सगळ्याला एकच एक व्यक्ती जबाबदार असते ते म्हणजे तुम्ही स्वतः, आणि तुमचे मन, हेच मन तुम्हाला त्याला पाहिजे तिकडे नेते, मग ते चांगले असेल किवां वाईटही असेल,त्याला जिकडे तुम्हाला न्यायचे असेल तिकडेच तुम्ही जाता,आणि म्हणूनच एकाच शिकवण देऊनही एक मुलगा पोलिस होतो आणि दुसरा चोर.
 हेच मन माझ्या - तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गुरु,आणि शेवटपर्यंत तुमच्या बरोबर असणारा, तुम्हाला शिकवणारा,तुमची साथ शेवटपर्यंत करणारा एकमेव गुरु. काय वाटते तुम्हाला ह्याबद्दल...,हे कितपत खरे असावे असे वाटते..., मला विचाराल तर मी म्हणेन हो,माझ्या आयुष्यातला सगळ्यात श्रेष्ठ गुरु म्हणून मी माझे मनाला मानतो. पण ह्या माझ्या विचारांमुळे वरील गुरु मंडळींचे माझ्या आयुष्यातले महत्त्व कमी करतोय असे मुळीच नाही,त्यांचे पण तेवढेच महत्त्व आहे पण त्यांचे स्थान वेगळे आहे. ते दिशादर्शक आहेत आणि माझा हा गुरु मला त्याचेवरून चालायचे की नाही हे सांगणारा आहे,त्या किवा अजून दुसऱ्या दिशेने नेणारा आहे. ह्याच गुरूवर अवलंबून आहे मी कुठे जाणार, वर की रसातळाला. वरील सर्व गुरूंशी तुम्ही खोटे बोलून वेळ मारून नेऊ शकता, पण ह्या मन रुपी गुरुशी तुम्ही खोटे बोलू शकत नाही,फसऊ शकत नाही.
ह्या मन रुपी गुरूची दोन रूपे असतील असे मला वाटते,एक काळे म्हणजे वाईट( ज्याला आजकाल negativity  म्हणतो आपण.), आणि दुसरे गोरे ( ज्याला आपण positivity म्हणतो) म्हणजे चांगले, तर ह्या दोघांमध्ये सतत दंद्व चालू असते,ह्यात जो जिंकतो, ते रूप आपल्याला त्याच्या विचाराने चालायला लावते,तिथे आपले काहीच चालत नाही. जे रूप आपण स्वीकारतो तसेच आपले आयुष्य घडते, त्यात दुसरे कोणाचेच काहीच हात नसतो,स्वतः आपणच ते स्वीकारलेले असते. ह्याच गोष्टींमुळे आपण आपले आयुष्य चांगले,आनंदी, यशस्वी किवां वाईट, दुःखी,अपयशी बनवतो, कोणी दुसरे ते बनऊ किवां बिघडऊ शकत नाही. तुम्ही स्वतः जबाबदार असता तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी. ते चांगले झाले तरी किवां वाईट झाले तरी,दुसरे कोणीच नाही. ( ह्याला अपवाद असू शकतो,नाही असे नाही.).
एखादी आई पोटतिडकीने कोणाला तरी सांगत असते, अहो आमचा बंड्या नाही हो त्यातला त्याचे मित्रच वाईट आहेत,त्यामुळे तो वाईट मार्गाला लागला,आता त्या भोळ्या आईला कोण सांगणार की अग आई तुझ्या बंड्याच्या मनानेच तो वाईट मार्ग स्वीकारला आहे, त्यात त्याच्या मित्रांना वाईट म्हणून काय उपयोग,त्याचे चांगले जरी मित्र असते तरी असाच वागला असता तुझा बंड्या. अजुन एक नेहमीचे वाक्य,"अरे बघ जरा तुझ्या मोठ्या भावाकडे,तो किती हुशार, नोकरी,घर सगळे कसे छान केलेय,नाहीतर तू नुसता खायला काळ आणि भुईला भार आहेस." आता ह्यात त्या मोठ्या भावाने चांगल्या मनाचे ऐकले असेल तो तसा वागला आणि पुढे गेला,लहान भावानी वाईट मनाचे ऐकले असेल म्हणून तो तसा झाला,दुसरे काही कारण असू शकत नाही ह्यात. असो,अशी खूप काही उदाहरणे देता येतील. सांगणे इतकेच कि तुमचे मन हे तुम्हाला घडवत असते, किवां असेही म्हणता येईल,त्याच्या वराच सर्वस्वी आपण अवलंबून असतो.
आपल्याकडे सगळेच जण नेहमी म्हणत असतात," मन नेहमी प्रसन्न ठेवावे, आनंदी ठेवावे, मनात काही वाईट विचार येऊ देऊ नये, चांगले विचार करावेत, असे अजून बरेच काही, हे सगळे कशासाठी असावे. मन प्रसन्न तर आपण प्रसन्न हेच गणित आहे,म्हणजे शेवटी काय तर,आपल्याला नियंत्रित करणारे कोण तर मन, त्यालाच नेहमी जपले पाहिजे,त्यालाच नेहमी चांगले ठेवले पाहिजे त्याला योग्य दिशेने वळवायला हवे,त्यातल्या काळया बाजूला दाबायला हवे,जेणेकरून आपण आनंदी,यशस्वी राहू शकू,होऊ शकू.
म्हणूनच आपले संत सांगून गेलेत," मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण"......

आशुतोष दंडगव्हाळ....

Sunday, August 19, 2018

" मनातला कप्पा "

" मनातला कप्पा "
आपल्यापैकी बऱ्याच जणांचे आजकाल बँकेत लॉकर आहे, ती काळाची गरज , त्या लॉकर च्या भाड्यापोटी बरेच पैसे खर्च होतात, पण आपण कधी ह्याकडे लक्ष दिलय का,देवाने आपल्याला जन्मतहाच असे एक लॉकर दिलंय ज्याचे तय हयात आपल्याला एक पैसाही भाडे भरावे लागत नाही,ज्यात आपण कितीही,काहीही,आणि कितीही दिवस ठेवले तरी. आले का लक्षात,नाही आले ना लक्षात? ते म्हणजे आपले मन आणि त्यातले भरभक्कम लॉकर( मनातला कप्पा).

हो आता तुम्ही म्हणाल हे काय लॉकर आहे का,त्यात पैसे,दागिने,महत्वाचे पेपर थोडीच ठेवता येतात,हो अगदी मान्य,पण त्याही पेक्षा खूप काही महत्वाचे असते ज्या वर आपण जगत असतो, ते त्या पैश्यांपेक्षा, दागिन्यां पेक्षाही महत्वाच्या असतात,त्या म्हणजे आपल्या आठवणी, हो की नाही?

ह्या लॉकर ची वैशिष्ठ्ये बघा, तुमचे आजचे गूगल क्लाउड प्लेस, मेमरी कार्ड mb,gb,tb मधले कितीतरी साठवयाच्या जागा,पण ह्या सगळ्यांना मर्यादा आहेत, पण ह्या मनातल्या कप्प्याला कुठल्याच मर्यादा नाही,पाहिजे ते,पाहिजे तसे,पाहिजे तेवढे साठवा,कुठलेही चार्जेस, खर्च नाही,जागा कमी आहे कधीच बोलणार नाही.

दुसरे म्हणजे, कुठल्याही फॉरमॅट मधली फाईल असो , कुठेही, कधीपण, ओपन करा, चटकन उघडणार, ह्याच फॉरमॅट मध्ये फाईल पाहिजे, ऑडियो, व्हिडिओ प्लेअर पाहिजे,jpeg पाहिजे असले काही सांगणार नाही. तुम्हाला वाटले की उघडा ,पाहिजे तेव्हा, पाहीजे तसे,आहे की नाही कप्पा भारी, अहो अजून खूप काही वैशिष्ठ्ये आहेत,सांगायला शब्द अपुरे पडतील,तरी थोडा प्रयत्न करतोय..

तिसरे वैशिष्ठे म्हणजे,ह्यातल्या आठवणी उघडल्या की त्या नुसत्या आठवत नाहीत,तर त्या दिसतात, त्याहीपेक्षा त्यात आपण स्वतःला अनुभवतो अगदी त्या त्या वयात जाऊन,जसेकाही आजही तेच आणि तसेच आपण जगतोय,आहे की नाही गम्मत,असे कुठल्या तुमच्या कार्ड मधल्या  फाईल ओपन करून बघून जमेल का,फाईल ओपन केली दिसले संपले,इथे जिवंत अनुभव,आहे की नाही दैवी देणगी..

आपण नेहमी फोटोत, व्हिडिओज मध्ये आनंदाचे क्षणच साठवतो, कोणी भांडण झालेल्याचे फोटो काढलेत असे कधी ऐकले का, पण ह्या मनाच्या कप्प्यात अानंदाबरोबरच दुःखाचे,अपमानाचे,भांडणाचे,
सन्मानाचे सगळे सगळे क्षण साठवलेले असतात,तुम्ही नाही म्हटले तरी ते साठवले जातात. आहे की नाही गंमत, कुठलीही कमांड न देता,आपोआप सगळे क्षण रेकॉर्ड करणारे,आणि साठऊन ठेऊन तुम्हाला पाहिजे तेव्हा समोर देणारे असे हे चकटफू लॉकर, अमर्यादित स्टोरेज असलेले, कुठलेही भाडे न आकारणारे..

हो सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलेही पासवर्ड किवां सुरक्षिततेची कुठलीही कडिकुलपे नसताना,तुमच्या संमतीशिवाय न ऊघडणारे असे हे लॉकर आहे.

दोस्तांनो मी ह्याबाबतीत अजून काय सांगणार हे वाचताना तुम्हाला स्वतःलाच ह्या कप्प्याचे( लॉकरचे) महत्त्व जास्त कळेल,तुम्ही स्वतःच ते कबुल कराल.

हो एक मात्र आहे,ह्या कप्प्याची काळजी घ्या, तो कोणासमोर उघडताना ,चुकीच्या माणसा समोर तर कप्पा उघडला जात नाहीये ना ते मात्र नक्की बघा...

आशुतोष दंडगव्हाळ.....

Sunday, April 22, 2018

" रंगोली "

दि. २२.४.२०१८

" रंगोली "....

टीव्ही, जो आजकाल प्रत्येक घरात एक तरी आहेच, तर हा टीव्ही जेव्हा भारतात अाला त्या वेळेस एकच चॅनल दिसायचे ते दूरदर्शन, भारताचे स्वतःचे चॅनल, तर ह्या चॅनल वर एक से एक नितांत सुंदर कार्यक्रम असायचे,त्यातला एक जुन्या गाण्यांचा कार्यक्रम जो माझेमते जवळपास आपल्या अगोदरच्या निदान दोन पिढ्या तर नक्कीच बघत असतील,( तुम्ही म्हणाल कधी सुरू झाला त्याचे वर्ष वगैरे तर सांग, तर अगदी प्रांजळपणे सांगतो मला वर्ष वगैरे आठवण रहात नाही, जो माणूस मला तारीख आणि वर्षा सकट काही आठवणी सांगतो त्याचा मला नितांत आदर वाटतो,आणि भितीपण, कारण त्यांनी मला विचारू नये तुझा १० वी चा इंग्लिश चा पेपर कुठल्या तारखेला होता, किवां तुझे ग्रज्युएशन कधी पूर्ण झाले आणि अजून काय काय, असो हा झाला गमतीचा भाग,तर सांगायचे एवढेच की हा कार्यक्रम कुठल्या साली वगैरे चालू झाला ते आपण सुज्ञ वाचकांनी मला विचारू नये,😊😊)  ऐवढा जुना,पण आजही आवर्जून बघावा असा, तो म्हणजे "रंगोली".

प्रत्येक रविवारी सकाळी हा 8 वाजता सुरू 9 ला संपणारा, शनिवारी कितीही झोपायला उशीर झाला तरी,रविवारी 7 ला उठून तयारी करून टीव्ही समोर जाऊन बसायचे कधी हा कार्यक्रम चालू होतो त्याची वाट बघत. जुनी नितांत सुंदर गाणी,ताजा आलेला पेपर ,गरमागरम चहा,त्यात काही बुडवायला असले तर सोने पे सुहागा,अशी जय्यत तयारी करून हा कार्यक्रम बघण्यात जे सुख आहे ना ते शब्दात सांगणे अवघड,हो आता प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतीलही,पण माझ्यासारखे काही असतील ज्यांना ह्यात सुख, आनंद मिळत असेल,मिळवत असतील, आणि आहेत पण बरका..

आता तुम्ही मला वेड्यात काढाल,की काय हा माणूस,कुठल्या जुण्यापुरण्या काळातल्या गोष्टी करतो,आज एक बटण दाबले की पाहिजे ते गाणे ऐकता येते,तर मग रविवारी हक्काच्या सुट्टीच्या दिवशी छान झोपायचे सोडून सकाळी रंगोली बघायला उठायला सांगतोय.., पण खरेच सांगतो, भले आज पाहिजे ते,पाहिजे तेव्हा कुठलीही गोष्ट आपण बघू शकतो, मिळऊ शकतो, त्यातही आनंद आहेच आहे,नाही असे नाही,पण अनपेक्षित पणे ,मनात नसताना, किवा अपेक्षा नसताना एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तर त्याचा आनंद वेगळाच,आणि एक वेगळे सुख देणारा असतो,हे कोणीही मान्य करायलाच हवे.

तुमच्या आवडीची खूप गाणी असतील, ती तुम्ही वेळोवेळी तुमच्या कडच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये जमा करून ठेवता,पाहिजे त्या वेळेस ऐकायला, आणि ऐकतोही ती आपण,त्यातही सुख,आनंद असतोच. पण अनपेक्षित पणें एखादे  रफी ,लताचे, किवां अजून कोण्या आवडत्या गायकाचे आवडते गाणे ऐकायला मिळाले, किवा लागले तर जो आनंद होतो ना तो स्टोअर करून ऐकायच्या गाण्याने होत नाही ,मिळत नाही. त्यामुळेच हा कार्यक्रम माझ्यासारखी वेडी लोक अजूनही जगभरात बघतायत, कारण त्यातून मिळणारा आनंद हा खूप वेगळा आहे.....

ह्या रंगोली बद्दल माझ्या आयुष्यातला एक किस्सा सांगतो,रुबी हॉस्पिटल मध्ये माझे कॅन्सर चे ऑपरेशन झाले, त्यानंतर सात दिवस तिथेच होतो, त्यात रविवार होता,आदल्या दिवशी मी नर्स ला सांगितले होते,अहो मॅडम आम्हाला उद्या रंगोली बघायचीये,तेवढे सकाळी आम्हाला टीव्ही पाहू द्या,आणि रुबी मध्ये सुद्धा आम्ही रंगोली पहिली.

आजही दर रविवारी सगळ्यांना " उठा रे रंगोली सुरू होईल आता" मेसेज पाठवताना खूप छान वाटते......

आशुतोष दंडगव्हाळ....

Monday, April 16, 2018

" स्वतःची किंमत स्वतः ठेवावी "

१६.४.१८.


स्वतःची किंमत स्वतः ठेवावी....

एक नेहमीची तक्रार ऐकू येते,माझी कोणाला काही किंमतच नाही, मी सगळ्यांसाठी मर मर मरायचे त्याचे कोणाला काहीच नाही,अरे बाबा पण तू स्वतः स्वतःला कधी किंमत देतोस का,जर नसशील तर मग दुसऱ्याकडून का अपेक्षा की ते तुझी किंमत ठेवतील? अशी तक्रार करणाऱ्यांनी खरंच पहिले हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा,हो की नाही,तुम्हाला काय वाटते?

आपण कधीकधी स्वतःला ऐवढे खाली करून ठेवतो की समोरचा माणूस पण आपली किंमत करायला लागतो, असे होणे खरंच चुकीचे, त्यात काही लोक तर स्वतः बरोबर कुटूबियांचा पण सन्मान गमावून बसतात. हे खरेच चुकीचे. स्वतःचा सन्मान,किंमत ही ठेवलीच पाहिजे,तेव्हाच बाकीच्यांची आपण ठेऊ शकतो,आणि ते बघून समोरचा माणूस पण तो सन्मान, किंमत ठेवतो वा देतो.

साधे उदाहरण घ्या आपल्या कडच्या राजकारण्यांचे, स्वतःच्या मुलाला ते कधीच साध्या त्याच्या नावाने हाक मारत नाहीत,त्यामागे साहेब किवा राव लावतात.( दादासाहेब,भाऊसाहेब,रावसाहेब अजून असेच काही काही.) त्याला कारण आहे, लोक बघतात स्वतः वडील जर मुलाला असे साहेब वगैरे लावून बोलावतात मग आपण एकेरी उल्लेख कसा करायचा,म्हणून मग लोक पण त्या पंधरा वर्षाच्या मुलाला दादासाहेब वगैरे बोलावतात,ह्यातून होते काय तर आपोआप त्या मुलाला मोठेपण येते,आदर मिळतो,लोकपाल चारदा विचार करतात काही अपशब्द बोलायला.

तेच दुसरी बाजू घ्या,तुम्ही तुमच्या मुलांना नेहमी घालून पाडून बोलत रहा,हरकाम्या करा,बाहेरची लोक पण त्याला तसेच वागवतील, खरे वाटत नसेल तर करून बघा, तुमची खात्री पटेल.

काही  समजातील लोक बघा स्वतःच्या चालीरीती, देवधर्म, पूर्वापार आलेल्या प्रथा जीवापाड जपतो अगदी कुठेही राहिला तरी, म्हणून त्यांची ते कुठेही राहत असले तरी भरभराट होते,सगळे बाकीचे लोक पण त्यांच्या चालीरितींचा सन्मान करतात,तो समाज आपोआप मोठा होतो. ह्यात काय झाले त्या समाजातल्या लोकांनी स्वतः पहिले आपला सन्मान केला,म्हणून बाकीच्यांनी त्यांचा सन्मान ठेवला. असो असे खूप उदाहरणे देता येतील.

शेवटी काय तर, सन्मान,महत्त्व,किंमत, हे दुसरे कोणी देण्यापेक्षा स्वतःचे स्वतःच ठेवा,म्हणजे समोरून पण तो तसाच परत मिळेल,आणि खरंच आहे ते,स्वतःचा,आपल्या घरातल्या लोकांचा,आपल्या काम करण्याच्या जागेचा,तिथल्या लोकांचा, आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा सन्मान आपणच ठेवायला हवा. तेव्हाच समोरचा पण सन्मान करेन...
हो की नाही..

आशुतोष दंडगव्हाळ...

Sunday, April 8, 2018

" पिढी - जुनी / नवीन "

दि. ८-४-२०१८.

पिढी - जुनी / नवीन....

आमच्या वेळेस असे नव्हते बाई, नाहीतर आमच्यावेळी असे नव्हते बुवा. आजची पिढी मजा करतीय नुसती. हे वाक्य आपल्या पैकी प्रत्येकाने ऐकली असतील,आपल्या घरातील थोरामोठ्याकडून ,
हो की नाही?

आजोबाआजी त्यांच्या मुलां,सूनानबद्दल, आईवडील त्यांच्या मुलांसूना बद्दल,आपण आपल्या मुलांबद्दल हे असेच चालत राहणार,न थांबणारी साखळी आहे ही.

सगळ्यांनाच वाटते आपल्या पुढची पिढी ला जास्त सुखसोयी, आराम,चांगले आयुष्य मिळते मागच्या पेक्षा. काहिबाबतीत खरे पण असेल काही बाबतीत. पण खरेच सांगा असे आहे का नक्की ?

मला विचारलं तर मी  म्हणेन की आपल्या अगोदरची पिढी सुखी होती.

प्रत्येक पिढीत काही चांगल्या काही वाईट गोष्टी होत्या,काही फायदे काही तोटे होते, पण खरेच सांगायचे तर,विचार केला तर आपल्या मागच्या पिढीत तोटे कमी, फायदे जास्त होते असेच प्रत्येक पिढीला अनुभव येईल,हेच आणि हेच सत्य अनुभवायला मिळते. हो आता कोणी ह्या मझ्या मताशी सहमत असेल कोणी नाही, पण स्वतःच्या मनाला विचारलं तर ते ह्याचे  उत्तर नक्कीच मी जे म्हणतो तसेच आणि तेच असेल ह्याची खात्री आहे मला.

तुम्ही म्हणाल काय हा माणूस,आज प्रगत विज्ञान, दवाखाने, रस्ते, सुखसुविधा आहेत, मागच्या पिढीला असे काही नव्हते,हो पण हे सगळे असले तरी त्याबरोबर येणारी गर्दी,ट्रॅफिक,वेळ,चांगले खायला मिळणे, शांतता,निसर्ग, सुखशांती बरेच काही आज आपल्याकडे नाहीये.

अगदी छोटेसे उदाहरण घ्या,आपल्या पिढीला जे आजोळसुख मिळालेय ते आपल्या मुलांना मिळतेय का,ते आजोबा-मामाच्या घरी केलेली मस्ती,सुट्ट्या कधी लागतायेत असे व्हायचे,ती 2-2 महिने केलेली धमाल आठऊन बघा ,ती आजकालच्या मुलांना मिलतिये का?
त्याही अगोदरच्या पिढीत जाल तर अजून एक गोष्ट जाणवेल ती ही,नोकरी-कामासाठी,शिक्षणासाठी कुठे बाहेरगावी जावे लागले तर लगेच अमक्याचा तमका कोणीतरी त्या गावी आहे,त्याचे भरोषावर माणसे जायची आणि तो तिथला माणूस पण स्वतःचे कोणी माणूस असल्यासारखे आदरातिथ्य पार पडायचा,हे सुख आज तुमच्या आमच्या वाटेला नाही. अश्या बऱ्याच गोष्टी पिढ्यानपिढ्या सुटत गेल्या,मिळणे दुरापास्त झाल्या.

हो आज आपण खूप काही पुढे गेलो असू,पण मागे जे सुटले ते परत मिळू शकेल का आपल्याला...

एकूण हेच की, प्रत्येक पिढीला हेच वाटणार,आणि खरेच आहे ते की आपल्या अगोदरची  पिढी ही आपल्यापेक्षा सुखी होती.

आशुतोष दंडगव्हाळ...

Friday, March 30, 2018

" द बकेट लिस्ट "

दि. ३०.३.२०१८.

द बकेट लिस्ट......( मन मारून जगणे/जगवणे नको )

एक सुंदर इंग्लिश चित्रपट पाहण्यात आला," the bucket list". मॉर्गन फ्रीमन आणि जॅक निकोलसन ह्या दिग्गज कलाकारांनी जिवंत केलेला हा चित्रपट, विषय तसा आपल्याला न आवडणारा, चित्रपटात दोन मरणासन्न पात्र आहेत जे स्वतःचे आतापर्यंतचे आयुष्य कसे जगले,आणि ते जगताना खूप काही स्वतःसाठी करायचे किवा जगायचे जे राहुन गेले, त्याची एक यादी  बनवतात,आणि त्या यादीतील गोष्टी कश्या पूर्ण करतात ह्यावर संपूर्ण चित्रपट, बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती ही की आपलिही अशीच बकेट लिस्ट तयार होऊ शकते. आपणही आयुष्यात खूप काही सोडून देतो, कधी परिस्थिती,पैश्यामुळे, कधी वेळे मुळे, कधी जबाबदाऱ्यान मुळे. कारणे बरीच असतील, पण राहून जाते खरे.

आपले आयुष्य तसे खूप साधे असते,थोडा प्रयत्न केला तर प्रत्येकालाच स्वतःसाठी वेळ काढणे जमू शकते, मग आपल्या कडून तो स्वतःसाठीचा वेळ काढणे का होऊ नये?( कधी कुठे पैशांमुळे पण असू शकेल, पण खरंच सांगतो आपण आपल्या कुवतीमधलीच स्वप्नं बघत असतो, त्यासाठी लागणारा पैसा पण असतो,पण आपण तो स्वतः वर खर्च करण्या पेक्षा दुसरीकडे खर्च करतो.) आपल्याला सगळ्यांना एक किडा चावलाय, मीपणाचा. मी नसेन तर असे होईल,मी नाही केले तर कोण करेल, जसे काही आपल्यामुळेच जग चालू आहे, आपण नसलो तर जगबुडी होईल हे आणि असेच काहीसे. खरे सांगायचे तर तुम्ही असल्या-नसल्याने जग चालत किवा थांबत नाही, कोणाचे आडतही नाही. जरा तो मीपणा, लोकांच्या नजरेत मोठे व्हायची हौस सोडली तर अशी बकेट लिस्ट बनवायची वेळ आपल्यावर येणार नाही.

आपल्या ह्या मी पणा मुळे,आपल्या जवळ राहणाऱ्या लोकांची सुद्धा अशीच बकेट लिस्ट तयार होऊ लागते, मग, त्या तुमच्या मोठेपणा करण्याचा फायदा कोणाला,हा विचार व्हायला हवा. स्वतः मन मारून जगतो तर जगतोच, पण स्वतः बरोबर सोबत राहणाऱ्या माणसालाही मन मारायला लावतो,हे कुठले जगणे, ह्यात कुठले मोठेपण...प्रश्न पडतो,पण उत्तर शोधायची तयारी मात्र आपण दाखवत नाही,असे का..

ह्यातून स्वतःसाठी पेक्षा कधी कधी ह्याचीच खंत जास्त वाटते की आपण एखाद्याला आपली गरज असताना त्याचेसाठी आपण काही करू शकलो नाही,भेटू शकलो नाही. ही आणि अश्या बऱ्याच गोष्टींची बकेट तयार होत राहाते.

पण अशी बकेट लिस्ट बनवण्याची वेळच येऊ दिली नाहीतर किती छान...... स्वतःचे आणि आपल्या बरोबर राहणाऱ्यांन च्या मनासारखे जगण्याचा प्रयत्न करून बघायला काय हरकत......

आशुतोष दंडगव्हाळ....


Tuesday, March 27, 2018

" योग्य वेळ "

दि.२७ - ३ - २०१८


"योग्य वेळी योग्य गोष्टी ह्या व्हायलाच हव्यात" ......

आपल्याकडे बरेचदा आपण हे वरील वाक्य घरातील थोरा-मोठ्यांच्या तोंडून ऐकत आलोय,ऐकतोय आणि आज आपणही ते सांगतोय. पण खरंच ते वाक्य किती बरोबर आहे, आयुष्यात किती महत्वाचे आहे,  ते तुम्हा/ आम्हाला  स्वतःची चाळिशी ओलांडल्या शिवाय कळत नाही.

आजुबाजूला जेव्हा बघतो, काही प्रसंगांना सामोरे जातो,कधी आपल्या कीवा कधी आपल्या आजुबाजूच्या लोकांच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात त्यावेळेस नक्कीच प्रत्येकाला ह्या वाक्याची आठवण होते,होत असेल,कोणी प्रांजळपणे कबुली देतो, बाकीचे मात्र ते न मानता दुसऱ्यावर खापर फोडून ती कबुली देणे टाळतात. एकूण काय तर ते वाक्य आपण कुठेतरी आयुष्यात मानलेले नसते,त्यावाक्क्याची आठवण ठेवलेली नसते, त्याचे परिणाम म्हणून आपण काही गोष्टींना आयुष्यात मुकतो, कीवा त्या आपल्याला परत मिळत नाहीत.
योग्य वेळी शिक्षण,व्यवसाय/नोकरी, प्रपंच,स्वप्नं सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे,सगळ्याच जागी योग्य हा शब्द हवाच,त्याला सोडून आयुष्य नाही.

माझे स्वतःचेच उदाहरण घ्या, मी योग्य वेळी योग्य डॉक्टर कडे गेलो असतो तर आज माझे दोन्ही कान शाबूत असले असते,पण मी ते नाही केले आणि आयुष्याचे नुकसान करून घेतले,आता एका कानावर अवलंबून आहे, त्याचापण काही भरवसा नाही कधी बंद होईन,पण आता माझ्या हातात काहीच नाही.

हया वाक्यात दोन शब्द महत्वाचे एक " योग्य" आणि दुसरा "वेळ". वेळ जी एकदा गेली की परत येत नसते,काहीही केलं तरी परत मिळणार नसते, आणि वेळ तर भरपूर होता हो पण तो योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी वापरला गेला नाही तर त्या वेळेला पण किंमत राहात नाही. म्हणून ह्या दोन्ही शब्दांचे महत्त्व ज्याला कळले,ज्यांनी त्या दोन शब्दांचा वापर आयुष्यात नीट केला ते नेहमीच यशोशिखरावर असतील, आणि आहे तसेच.

आपण आज बाजारात ज्या लोकांची पुस्तके मार्गदर्शनासाठी घेतो,त्यात ह्या वाक्क्या शिवाय दुसरे काय असते बरे.  अश्याच लोकांच्या आयुष्यावरची पुस्तके मग आपण यशस्वी होण्यासाठी घेतो,वाचतो,पण त्यावेळेस आपल्या हातातून ही दोन्ही ( योग्य आणि वेळ ) गेलेले असते.

हो पण वेळ निघून गेली,किवा संधी गेली म्हणून प्रयत्न करणे सोडू नयेत, फक्त होते ऐवढेच की प्रयत्न जास्त करावे लागतात आणि वाट पहावी लागते.

शेवटी महत्वाचे काय तर हेच की " योग्य वेळी योग्य गोष्टी व्हायलाच हव्यात."

आशुतोष दंडगव्हाळ.....




Tuesday, March 20, 2018

" नात्यान पलीकडची नाती "

नात्यान पलीकडची नाती.....

भारतीय माणूस नेहमी आपल्या नातेवाईकांमध्ये रमणारा,सगळ्यांना अभिमानाने सांगेल आमचे येवढे नातेवाईक आहेत,असे तसे. पण ज्या वेळेस आपण कामानिमित्त कुठेतरी दूर जातो त्यावेळेस त्या नवीन जागेत जी नाती निर्माण होतात ती खूप वेगळी असतात,त्या नात्यांना नाव कुठलेच नसते,पण ती तरीही खूप घट्ट आणि हवीहवीशी वाटणारी असतात, त्या अनोळखी प्रदेशात खंबीर पाठिंबा देणारी असतात, खऱ्या नात्यांपेक्षाही मोठी होऊन जातात.आणि हो ह्या नात्यांचे एक असते ही नाती जातपात, लहानमोठे,गरीब श्रीमंत,असले काही बघत नाही,अठरापगड जातींचे लोक ह्यात एकत्र येतात एक नवा समाज तयार होतो,हो गरजेपोटी पाहिले एकत्र येतात पण त्यातून अशी नाती निर्माण होतात की मग गरज तिथे दुय्यम होऊन जाते.
वडील शासकीय खात्यात,त्यामुळे आमचे घर म्हणजे विंचवाच्या पाठीवरचे बिऱ्हाड, आज ह्या गावात तर उद्या त्या गावात, कधी ऐके ठिकाणी 2-3 वर्ष सलग राहिलेलो आठवत नाही. नोकरीच्या जागा पण अश्या, किनवट, परभणी,नांदेड, अजून कुठली कुठली खेडी. सगळे नातेवाईक औरंगाबाद,पुण्यात आणि आम्ही दूर दुसऱ्या टोकाला. त्यावेळेस आजच्या सारखे गाड्यांची सोय नव्हती येण्याजाण्यासाठी, क्वचित एखादी एस टी असायची,त्यामुळे सहसा नातेवाईकांची भेट वर्षातून एकदा कीवा कधी दोन वर्षांतून एकदा, पण मग जिथे राहायचो तिथेच आजुबाजूला ही अशी पल्याडली नाती निर्माण झाली कधी झाली कशी झाली ते नाही कळाले,पण मग आजोबा ,आजी,मामा, बहीण भाऊ किती तरी,काही अशी ज्याला नावसुद्धा नव्हते.
किनवट च्या आम्मा( खोजा जातीतील ह्या धिप्पाड, नजरेत जरब असणाऱ्या ) , माझ्या आईला त्या मुलगी मानायच्या, मुलीप्रमाणे त्यांनी तिला सांभाळले, तिथलेच खान डॉक्टर,. परभणीचे सरदेशपांडे काका काकू,त्यांची मुले, लहानपणी मी सकाळी उठलो की त्यांच्या घरी माझे बाकीचा दिवस जायचा,असे आई सांगायची,तिथलेच दाभाडे कुटुंब, असे कितीतरी , ती नावे न संपणारी.
मला जास्त आठवते  ते देगलुर (त्यातल्या त्यात ह्या गावात जरा 4-5 वर्षे सलग काढली आणि थोडा मोठा झालो होतो म्हणून  इथले सगळे आठवते ). पपांच्या ऑफिस मध्ये एक सोनिकाका शिपाई म्हणून होते, आम्ही दोघे भावंडं ह्या माणसाकडे च जास्त असायचो, अगदी आजोबांपासून मित्रा पर्यंतचे सगळी नाती त्यांच्यात एकवटली होती, खांद्यावर बसून फिरवणारे सोनीकाका, गणपतीत अामचेकडून डान्स बसऊन घेणारे डायरेक्टर,अजून काय काय, टेलर काका ते व त्यांचे कुटुंब, कुठला तरी सण होता, आईला तिच्या माहेरची खूप आठवण येत होती म्हणून ती रडत होती त्याच वेळेस टेलर काका घरी आले होते ,तिला तसे रडताना पाहून त्यांचे डोळ्यात पाणी आले,ते तिला म्हणाले पोरी आजपासून माझे घर म्हणजे तुझे माहेर,परत असे सणाला रडायचे नाही,त्यादिवसापासून आईला एक माहेर मिळाले. . तिथेच मुलासारखे प्रेम करणारे गायकवाड काका आणि तबला शिकवताना एकदम कडक गुरु,दोन्ही कसे जमायचे त्यांना ते समजायचे नाही, शिकवताना पोराला मारले म्हणून नंतर स्वतःच रडायचा हो हा माणूस.
असंच एक कुटुंब ज्यामुळे माझ्या आयुष्याला अर्थ आला,आज जो काही मी आहे, जे काही मी मिळवले ते कापसे पती,पत्नि मुळे,त्यांनी मला ऐकु येत नसताना,कानाचा आजार माहीत असताना मला नोकरी दिली ,आणि माझेवर जो विश्वास दाखवला तो दुसरे कोणी करू शकले नसते, माझ्या आजारपणात ह्या दोघांनी जी काही मदत केली ती विसरणे कदापि शक्य होणार नाही, काय नाते होते त्यांच्याशी माझे बॉस होते माझे ते,पण परत इथे तेच अदृष
 नाते काम करून गेले.
औरंगाबादचे घाटगे काका काकू , विजन अंकल ( माझे पुण्यात कॅन्सर चे ऑपरेशन झाले होते,त्यावेळी त्यांची स्वतःची तब्बेत बरी नसताना आजोबांच्या वयाचा हा माणूस,25 km वरून मला हॉस्पिटल मध्ये बघायला आले होते. आणि हो स आम्ही जिथे राहतो तिथे मला एक गोड बहीण आणि पंत मिळालेत,काकडे पती पत्नी.

ही अशी माणसे आणि अजून कितीतरी, लिहायला जागा अपुरी पडेल,  ती माणसे ती नाती आयुष्यातून कधीच काढून टाकू शकत नाही कीवा विसरुपण शकत नाही....

आशुतोष दंडगव्हाळ.....

Friday, March 16, 2018

" भरल्या ताटावरून "

भरल्या ताटावरून....
सगळीकडे सध्या चर्चा आहे ती बॉलिवूड क्वीन श्रीदेवी च्या अकाली मृत्यूची,तिच्यावर खुप वेगवेगळे मेसेजेस सोशल मीडयावरून फिरतायेत. खूप जास्त चर्चा होतीय असे नाही वाटत, तीच्या मृत्यूच्या बातमीनंतर जगात,भारतात खूप काही घडले,पण त्यावर काहीच चर्चा झाली नाही किवा त्याबद्दल जास्त बोलले गेले नाही, का असे,सहज मनात विचार आला तिच्या अचानक असे जाण्याचा  ( भरल्या ताटावरून उठू नये ) ह्या मराठी म्हणीशी काही संबंध असेल का?
आपल्याकडे घरातले मोठे नेहमी बोलताना ऐकलेय कितीही काही झाले तरी भरल्या ताटावरून उठून जाऊ नये, खरंच आपल्याला असे जाणे किवा कोणी असे करणे आवडत नाही, सगळे चांगले चालू असताना,सगळे सुख आले असताना,अचानक कोणी जर गेले तर,बोलताना सगळे म्हणतात,आता कुठे बरे दिवस आले होते,सुख भोगायचे तर हा/ही असा सगळे सोडून निघून गेला/गेली.
हेच आणि असेच काहीसे श्रीदेवी च्या जाण्याबद्दल वाटत असेल लोकांना,म्हणून त्याची जास्त चर्चा होत असली पाहिजे. तिचे अगोदरचे खडतर आयुष्य,त्यानंतर आलेले सुख,छान छोटेसे कुटुंब,मुलीचे करिअर,स्वतःचे चित्रपट,सगळे सगळे छान चालू,सुरू असताना( हो अर्थातच हे सगळे पेपर किवा सिने मॅगझिन मध्ये वाचलेल्या माहितीवरून बोलतोय) तिचे असे एक्झिट होणे कोणालाच रुचले नसावे म्हणून  त्याबद्दल येवढी चर्चा.
साधे पिक्चर मध्ये शेवटी सगळे आलबेल होत असताना हिरो आणि खलनायकाचे धिशुंधिशुं होताना हीरो चा मृत्यू दाखवला तर तो आपल्याला आवडत नाही,ते ह्याच मुळे असावे.

आशुतोष दंडगव्हाळ....

Tuesday, March 13, 2018

" भाषा दरिद्रता "

भाषा
सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात महत्वाचे आणि पहिले काम, व्हॉटसअप उघडून बघणे ते मी करत होतो ( काही लोक अजुनही कराग्रे वसते लक्ष्मी किंवा अजून सकाळचे काही श्लोक म्हणतात सकाळी, अगदीच old-fashioned बुवा 😉) नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग चे आणि कुठल्या कुठल्या इंग्लिश सायंटिस्ट आणि सेंट्सची शुभ वचने आली होती. नाही म्हणायला एखाद् दुसरा स्वामी विवेकानंदांचा मेसेज असतो कधी कधी, पण खूप कमी.
प्रश्न असा की भारत भूमी संतांची, तत्ववेत्त्यांची भूमी, तिथे शुभ विचारांची, तत्वज्ञानाची काय कमी, मग आपल्याला इंग्लिश विचारवतांच्याच वचनांची काय गरज, इथे कितीतरी थोर संत महात्मे, विचारवंत होऊन गेले, आहेतही, मग आपल्याला इंग्लिश, युरोपियन, किंवा अजून तत्सम बाहेरच्या विचारवंतांची गरज का पडावी?  डोक्यात विचार चालू झाला, आणि थोडे आजुबाजुला बघायला सुरुवात केली, मी स्वतः जी पुस्तके वाचायला घेतली होती त्यातली 70% पुस्तके इंग्लिश लेखकांची होती, बाकीची आपल्याकडील. मग लेकीची शाळेतली पुस्तके उघडली तीही बरीचशी बाहेरच्या विद्यापीठातील, त्यात भारतातल्या विचारवंतांचे, किंवा संतांची उणीव प्रकर्षाने जाणवली. मुलीला शाळेत सोडल्यावर सहज शाळेच्या भिंतींवर लक्ष गेले. तिथेही इंग्रजी संतांचीच वचने दिसली.आम्ही शाळेत असताना शाळेतल्या भिंतींवर सर्व मराठी संत, विचारवंतांची वचने लिहिलेली असायची. तीच समजून घेता घेता आयुष्य कमी पडतेय, कधी कुठल्या बाहेरच्या विचारवंतांची गरजच पडली नाही.
 मग आत्ताच आपल्याला व्यक्त व्हायला, चांगल्या विचारांसाठी, किंवा इंग्रजी भाषेची, बाहेरच्या विचारवंतांची का गरज पडते? ह्याला कारणीभूत कोण? आपली शिक्षणपद्धती, आपले वाचन, आपली भाषा दरिद्रता, का आपल्या भाषेत व्यक्त होता न येणं? आपल्याला काही सांगायचे ते आपल्या भाषेत सांगता न येणं, का त्याला आपल्या भाषेत शब्दच नाहीयेत असे वाटणं, का आपल्या भाषेत सांगायची लाज वाटणे, काय काय कारण असावे? का असे व्हावे, साधे कोणासमोर प्रेम व्यक्त करायला इंग्रजी भाषेचा आधार घ्यावा वाटतो, मराठीत सांगितले तर ते प्रेम नसते का, त्याला किंमत राहत नाही का? आज खरंच आपण इंग्रजीच्या एवढ्या आहारी गेलोय की स्वतःच्या भाषेची , की स्वतःच्या भाषेत व्यक्त होण्याची, स्वत:च्या साधू संतांच्या वचनांची, तत्ववेत्त्यांची लाज वाटायला लागलीय की काय तेच कळत नाही.

आशुतोष दंडगव्हाळ...

Sunday, March 4, 2018

" मिसळ - पाव "

" मिसळ पाव "
शनिवारची संध्याकाळ,  रविवारचा सकाळचा मिसळपाव चा बेत आखला,
आम्ही सगळ्यांनी आनंदानी त्या मेनुला मान्यता दिली,लागलीच हातोहात फरसाण आणून घेतले, पावाचे काय,ती म्हणाली ते मी सकाळी आणते.
सकाळी कधी नव्हे ते मी म्हणालो,पाव मी आणतो,त्यावर ती ठसक्यात म्हणाली तुम्हाला तो देणार नाही,माझ्यातला पुरुष जागा झाला,असे कसे तो नाही तर दुसरा,आणि तो मला का नाही देणार,त्याला धंदा नकोय का? त्यावर ती अजून जोरात म्हणाली उगाच नाही तिथे लक्ष घालू नका,मी आणते,त्याने नाही दिले तर तुमचेच वांदे होतील,त्याचे कडचेच पाव तुम्ही खाता बाकीचे तुम्हाला आवडत नाही,आमचेपण नाश्त्याच्या विचका करू नका.
आता तर मी पेटून उठलो,म्हटले काही झाले तरी पाव मीच आण नार.
मी शूर शिपाई पाव आणायच्या कामगिरीवर निघालो, जाताना तरी हिने शेपटीवर पाय दिलाच,त्याने तुम्हाला नाही म्हटले तर त्याला सांगा," वो अॅक्टिवा पे मॅडम आती है ना हमेशा उन्होंने बोला करके". असे सटकले माझे पण तो राग गिळून कामगिरीवर लक्ष ठेऊन निघालो.
पाव वाल्याकडे आलो,त्यांचेकडे मरणाची गर्दी, म्हटले च्यायला घरी लोक स्वयंपाक करतात की नाही, त्या गर्दीत कसेबसे त्या भय्यासमोर जाऊन सांगितले 4 पाव लादी देना. त्याने माझे कडे ना बघता सरळ सांगून टाकले,सिर्फ पाव नाही मिलेगा. त्याला  सगळे आमिषे दाखवून झाली,तरी बाबा दाबून नाहीच म्हणाला. तेव्हा कळाले पाव आणणे सोपे नाही राहिले,मला हीचा चेहरा दिसत होता खदखदून हसणारा,कसे जिरवले ते.
म्हटलं तिचेच नाव सांगून बघावे,तुला थोडी कळणार आहे,सांगू घरी आपणच आणले म्हणुन. मग त्या भय्याला हिने सांगितलेले वाक्य ऐकवले, क्या साब पहिले बोलनेका ना,मॅडम को बोलो एकदम ताझा पाव है आज. मी आपला मुस्कटात मारल्यासारखे चुपचाप पावाच्या लाद्या पिशवीत टाकून घरी युद्ध जिंकल्यासारखे आलो. घरी तरी हिने विचारलेच काय माझेच नाव सांगितले ना? 😬😬 मी आपला चुपचाप मिसळ पाव खात होतो,परत कधीच पाव आणायला जायचे नाही ही मनात खूणगाठ बांधून😛😔😊😊

आशुतोष दंडगव्हाळ....

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...