Sunday, April 22, 2018

" रंगोली "

दि. २२.४.२०१८

" रंगोली "....

टीव्ही, जो आजकाल प्रत्येक घरात एक तरी आहेच, तर हा टीव्ही जेव्हा भारतात अाला त्या वेळेस एकच चॅनल दिसायचे ते दूरदर्शन, भारताचे स्वतःचे चॅनल, तर ह्या चॅनल वर एक से एक नितांत सुंदर कार्यक्रम असायचे,त्यातला एक जुन्या गाण्यांचा कार्यक्रम जो माझेमते जवळपास आपल्या अगोदरच्या निदान दोन पिढ्या तर नक्कीच बघत असतील,( तुम्ही म्हणाल कधी सुरू झाला त्याचे वर्ष वगैरे तर सांग, तर अगदी प्रांजळपणे सांगतो मला वर्ष वगैरे आठवण रहात नाही, जो माणूस मला तारीख आणि वर्षा सकट काही आठवणी सांगतो त्याचा मला नितांत आदर वाटतो,आणि भितीपण, कारण त्यांनी मला विचारू नये तुझा १० वी चा इंग्लिश चा पेपर कुठल्या तारखेला होता, किवां तुझे ग्रज्युएशन कधी पूर्ण झाले आणि अजून काय काय, असो हा झाला गमतीचा भाग,तर सांगायचे एवढेच की हा कार्यक्रम कुठल्या साली वगैरे चालू झाला ते आपण सुज्ञ वाचकांनी मला विचारू नये,😊😊)  ऐवढा जुना,पण आजही आवर्जून बघावा असा, तो म्हणजे "रंगोली".

प्रत्येक रविवारी सकाळी हा 8 वाजता सुरू 9 ला संपणारा, शनिवारी कितीही झोपायला उशीर झाला तरी,रविवारी 7 ला उठून तयारी करून टीव्ही समोर जाऊन बसायचे कधी हा कार्यक्रम चालू होतो त्याची वाट बघत. जुनी नितांत सुंदर गाणी,ताजा आलेला पेपर ,गरमागरम चहा,त्यात काही बुडवायला असले तर सोने पे सुहागा,अशी जय्यत तयारी करून हा कार्यक्रम बघण्यात जे सुख आहे ना ते शब्दात सांगणे अवघड,हो आता प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतीलही,पण माझ्यासारखे काही असतील ज्यांना ह्यात सुख, आनंद मिळत असेल,मिळवत असतील, आणि आहेत पण बरका..

आता तुम्ही मला वेड्यात काढाल,की काय हा माणूस,कुठल्या जुण्यापुरण्या काळातल्या गोष्टी करतो,आज एक बटण दाबले की पाहिजे ते गाणे ऐकता येते,तर मग रविवारी हक्काच्या सुट्टीच्या दिवशी छान झोपायचे सोडून सकाळी रंगोली बघायला उठायला सांगतोय.., पण खरेच सांगतो, भले आज पाहिजे ते,पाहिजे तेव्हा कुठलीही गोष्ट आपण बघू शकतो, मिळऊ शकतो, त्यातही आनंद आहेच आहे,नाही असे नाही,पण अनपेक्षित पणे ,मनात नसताना, किवा अपेक्षा नसताना एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तर त्याचा आनंद वेगळाच,आणि एक वेगळे सुख देणारा असतो,हे कोणीही मान्य करायलाच हवे.

तुमच्या आवडीची खूप गाणी असतील, ती तुम्ही वेळोवेळी तुमच्या कडच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये जमा करून ठेवता,पाहिजे त्या वेळेस ऐकायला, आणि ऐकतोही ती आपण,त्यातही सुख,आनंद असतोच. पण अनपेक्षित पणें एखादे  रफी ,लताचे, किवां अजून कोण्या आवडत्या गायकाचे आवडते गाणे ऐकायला मिळाले, किवा लागले तर जो आनंद होतो ना तो स्टोअर करून ऐकायच्या गाण्याने होत नाही ,मिळत नाही. त्यामुळेच हा कार्यक्रम माझ्यासारखी वेडी लोक अजूनही जगभरात बघतायत, कारण त्यातून मिळणारा आनंद हा खूप वेगळा आहे.....

ह्या रंगोली बद्दल माझ्या आयुष्यातला एक किस्सा सांगतो,रुबी हॉस्पिटल मध्ये माझे कॅन्सर चे ऑपरेशन झाले, त्यानंतर सात दिवस तिथेच होतो, त्यात रविवार होता,आदल्या दिवशी मी नर्स ला सांगितले होते,अहो मॅडम आम्हाला उद्या रंगोली बघायचीये,तेवढे सकाळी आम्हाला टीव्ही पाहू द्या,आणि रुबी मध्ये सुद्धा आम्ही रंगोली पहिली.

आजही दर रविवारी सगळ्यांना " उठा रे रंगोली सुरू होईल आता" मेसेज पाठवताना खूप छान वाटते......

आशुतोष दंडगव्हाळ....

Monday, April 16, 2018

" स्वतःची किंमत स्वतः ठेवावी "

१६.४.१८.


स्वतःची किंमत स्वतः ठेवावी....

एक नेहमीची तक्रार ऐकू येते,माझी कोणाला काही किंमतच नाही, मी सगळ्यांसाठी मर मर मरायचे त्याचे कोणाला काहीच नाही,अरे बाबा पण तू स्वतः स्वतःला कधी किंमत देतोस का,जर नसशील तर मग दुसऱ्याकडून का अपेक्षा की ते तुझी किंमत ठेवतील? अशी तक्रार करणाऱ्यांनी खरंच पहिले हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा,हो की नाही,तुम्हाला काय वाटते?

आपण कधीकधी स्वतःला ऐवढे खाली करून ठेवतो की समोरचा माणूस पण आपली किंमत करायला लागतो, असे होणे खरंच चुकीचे, त्यात काही लोक तर स्वतः बरोबर कुटूबियांचा पण सन्मान गमावून बसतात. हे खरेच चुकीचे. स्वतःचा सन्मान,किंमत ही ठेवलीच पाहिजे,तेव्हाच बाकीच्यांची आपण ठेऊ शकतो,आणि ते बघून समोरचा माणूस पण तो सन्मान, किंमत ठेवतो वा देतो.

साधे उदाहरण घ्या आपल्या कडच्या राजकारण्यांचे, स्वतःच्या मुलाला ते कधीच साध्या त्याच्या नावाने हाक मारत नाहीत,त्यामागे साहेब किवा राव लावतात.( दादासाहेब,भाऊसाहेब,रावसाहेब अजून असेच काही काही.) त्याला कारण आहे, लोक बघतात स्वतः वडील जर मुलाला असे साहेब वगैरे लावून बोलावतात मग आपण एकेरी उल्लेख कसा करायचा,म्हणून मग लोक पण त्या पंधरा वर्षाच्या मुलाला दादासाहेब वगैरे बोलावतात,ह्यातून होते काय तर आपोआप त्या मुलाला मोठेपण येते,आदर मिळतो,लोकपाल चारदा विचार करतात काही अपशब्द बोलायला.

तेच दुसरी बाजू घ्या,तुम्ही तुमच्या मुलांना नेहमी घालून पाडून बोलत रहा,हरकाम्या करा,बाहेरची लोक पण त्याला तसेच वागवतील, खरे वाटत नसेल तर करून बघा, तुमची खात्री पटेल.

काही  समजातील लोक बघा स्वतःच्या चालीरीती, देवधर्म, पूर्वापार आलेल्या प्रथा जीवापाड जपतो अगदी कुठेही राहिला तरी, म्हणून त्यांची ते कुठेही राहत असले तरी भरभराट होते,सगळे बाकीचे लोक पण त्यांच्या चालीरितींचा सन्मान करतात,तो समाज आपोआप मोठा होतो. ह्यात काय झाले त्या समाजातल्या लोकांनी स्वतः पहिले आपला सन्मान केला,म्हणून बाकीच्यांनी त्यांचा सन्मान ठेवला. असो असे खूप उदाहरणे देता येतील.

शेवटी काय तर, सन्मान,महत्त्व,किंमत, हे दुसरे कोणी देण्यापेक्षा स्वतःचे स्वतःच ठेवा,म्हणजे समोरून पण तो तसाच परत मिळेल,आणि खरंच आहे ते,स्वतःचा,आपल्या घरातल्या लोकांचा,आपल्या काम करण्याच्या जागेचा,तिथल्या लोकांचा, आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा सन्मान आपणच ठेवायला हवा. तेव्हाच समोरचा पण सन्मान करेन...
हो की नाही..

आशुतोष दंडगव्हाळ...

Sunday, April 8, 2018

" पिढी - जुनी / नवीन "

दि. ८-४-२०१८.

पिढी - जुनी / नवीन....

आमच्या वेळेस असे नव्हते बाई, नाहीतर आमच्यावेळी असे नव्हते बुवा. आजची पिढी मजा करतीय नुसती. हे वाक्य आपल्या पैकी प्रत्येकाने ऐकली असतील,आपल्या घरातील थोरामोठ्याकडून ,
हो की नाही?

आजोबाआजी त्यांच्या मुलां,सूनानबद्दल, आईवडील त्यांच्या मुलांसूना बद्दल,आपण आपल्या मुलांबद्दल हे असेच चालत राहणार,न थांबणारी साखळी आहे ही.

सगळ्यांनाच वाटते आपल्या पुढची पिढी ला जास्त सुखसोयी, आराम,चांगले आयुष्य मिळते मागच्या पेक्षा. काहिबाबतीत खरे पण असेल काही बाबतीत. पण खरेच सांगा असे आहे का नक्की ?

मला विचारलं तर मी  म्हणेन की आपल्या अगोदरची पिढी सुखी होती.

प्रत्येक पिढीत काही चांगल्या काही वाईट गोष्टी होत्या,काही फायदे काही तोटे होते, पण खरेच सांगायचे तर,विचार केला तर आपल्या मागच्या पिढीत तोटे कमी, फायदे जास्त होते असेच प्रत्येक पिढीला अनुभव येईल,हेच आणि हेच सत्य अनुभवायला मिळते. हो आता कोणी ह्या मझ्या मताशी सहमत असेल कोणी नाही, पण स्वतःच्या मनाला विचारलं तर ते ह्याचे  उत्तर नक्कीच मी जे म्हणतो तसेच आणि तेच असेल ह्याची खात्री आहे मला.

तुम्ही म्हणाल काय हा माणूस,आज प्रगत विज्ञान, दवाखाने, रस्ते, सुखसुविधा आहेत, मागच्या पिढीला असे काही नव्हते,हो पण हे सगळे असले तरी त्याबरोबर येणारी गर्दी,ट्रॅफिक,वेळ,चांगले खायला मिळणे, शांतता,निसर्ग, सुखशांती बरेच काही आज आपल्याकडे नाहीये.

अगदी छोटेसे उदाहरण घ्या,आपल्या पिढीला जे आजोळसुख मिळालेय ते आपल्या मुलांना मिळतेय का,ते आजोबा-मामाच्या घरी केलेली मस्ती,सुट्ट्या कधी लागतायेत असे व्हायचे,ती 2-2 महिने केलेली धमाल आठऊन बघा ,ती आजकालच्या मुलांना मिलतिये का?
त्याही अगोदरच्या पिढीत जाल तर अजून एक गोष्ट जाणवेल ती ही,नोकरी-कामासाठी,शिक्षणासाठी कुठे बाहेरगावी जावे लागले तर लगेच अमक्याचा तमका कोणीतरी त्या गावी आहे,त्याचे भरोषावर माणसे जायची आणि तो तिथला माणूस पण स्वतःचे कोणी माणूस असल्यासारखे आदरातिथ्य पार पडायचा,हे सुख आज तुमच्या आमच्या वाटेला नाही. अश्या बऱ्याच गोष्टी पिढ्यानपिढ्या सुटत गेल्या,मिळणे दुरापास्त झाल्या.

हो आज आपण खूप काही पुढे गेलो असू,पण मागे जे सुटले ते परत मिळू शकेल का आपल्याला...

एकूण हेच की, प्रत्येक पिढीला हेच वाटणार,आणि खरेच आहे ते की आपल्या अगोदरची  पिढी ही आपल्यापेक्षा सुखी होती.

आशुतोष दंडगव्हाळ...

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...