Sunday, November 5, 2023

" नवरात्र आणि गरबा "

 


नुकतेच घट ,दसरा संपन्न झाला, नऊ दिवस नवरात्रीचे कसे गेले कळले नाही, त्यात सगळीकडे गरब्याची धूम होती, लॉक डाऊन नंतरचे मुक्त असे सेलिब्रेशन सगळ्यांनी साजरे केले. सगळीकडे नव चैतन्य - उत्साह  नुसता सळसळत होता.

गरबा दांडिया ची धूम सगळीकडे होती,कॉलेज ला असताना आमचा ग्रुप दांडियाची महिनाभरापासून तयारी करायचा, मुलींचे ड्रेस, दागिने ही तयारी तर मुलांची विविध दांडिया ग्रुप ची पासेस मिळवायची सेटिंग चालू असायची. एकदा चे पास हातात आले की हुश...

हे सगळे आठवायचे कारण ह्यावेळेस आमच्या घराजवळच दांडियाचे नियोजन केले गेले होते, रोज जाऊ जाऊ ठरऊन ही जाणे होत नव्हते,आज शेवटचा दिवस होता म्हणून आम्ही सहपरिवार दांडियाला पोचलो,नेहमीचेच वातावरण,काहीही change झाले नव्हते,तीच मुला मुलींची गर्दी नटून सजून आलेली तरुणाई, आत मध्ये जायची गर्दी. सगळे पाहून परत जुने आमचे दिवस आठवले.

आतमध्ये गेलो, आरती झाली आणि दांडीया ला सुरुवात झाली, धुंद होऊन मुले मुली च नाहीतर अगदी ६० -७० वर्षाची मंडळी पण हौस भागऊन घेत होती. 

सहज सगळ्यांकडे लक्ष गेले, किती प्रकार होते त्यात,कोणी नुसतेच बघायला आले होते, कोणी त्यांच्या लहान मुला मुलींना नटून थटून आणले होते,ती छोटी छोटी बच्चे कंपनी मोठे काय नाचतील इतके छान ठेका धरून नाचत होती, सगळ्यांचे मोबाईल त्यांचे फोटो ,व्हिडिओ काढण्यात मग्न होती, तरुणाई तर वेगळ्याच जगात होती, कोणी जोडीदाराबरोबर मुग्ध होऊन दांडीया खेळत होती, काही नुकतेच सजून धजून फोटो काढण्यात मग्न होती. ह्या लोकांना फक्त फोटो आणि सेल्फी काढण्यातच मजा येत होती. काही प्रौढ कपल्स अगदी ठरऊन नऊ दिवस न चुकता वेगवेगळी वेशभूषा करून सुरुवातीपासून ते थेट बंद होईपर्यंत खेळत होती. त्यांना कोणी डिस्टर्ब केलेले अजिबात आवडत नव्हते. 

त्यात काही बायका - माणसे अगदी धुंद होऊन दांडीया खेळत होती, माझ्यामते त्या दांडियात मुग्ध होउन दांडीया खेळून त्यात अगदी दमून जाऊन त्यांच्या संसारातील सगळा त्रास, थकवा, रुसवा-फुगवा ,नाराजी,मनाविरुद्ध कराव्या लागणार adjustment, ऑफिस च्या कटकटी, खर्चाचा मेळ बसून बसून दमलेला तो - ती विसरण्याचा प्रयत्न करत असतील का? कुठे बोलता येत नाही तर दांडीया खेळून त्या देवीसमोर त्यांचे मन मोकळे करून घेत असतील का? 

ते काहीही असो, पण खरेच कधी कधी असे वाटते की आजकालच्या जगात जिथे मोकळेपणाने कोणा समोर व्यक्त होता येत नसताना अशी जागा जिथे त्या देवीसमोर तिचे नामस्मरण करून तिच्या नावाचा जागर करत स्वतःला मुग्ध, सैल सोडून सगळा मनातला गोंधळ,त्रास काढून टाकता यावा ह्यासारखे सुख ते काय. दांडीया खेळून सगळी दमत नसतील,तर सगळे मनातले निघून गेल्यावर मन शांत झाल्यावरचा तो गोड थकवा असावा.

आपल्याला नेहमी सांगितले जाते आपल्याकडील प्रत्येक प्रथेला काहिन काही वैद्यकीय आधार आहे, ते सगळे खरेच आहे ह्याचा प्रत्यय ह्या नऊ दिवसात सगळ्यांना येत असेल हो की नाही....

आशुतोष दंडगव्हाळ...


Wednesday, September 13, 2023

अगतिकता की हव्यास??

 

दि.१३/०९/२०२३.

अगतिकता की हव्यास??

परवा ऑफिस मिटिंग साठी मुंबई ला गेलो होतो, सकाळी हॉटेल वरून ऑफिस ला रिक्षाने निघालो,आमचा रिक्षा वाला निघाला यूपी चा भय्या, माझे सोबत अजून एक ऑफिस चा मित्र होता, शुद्ध आणि कुठलीही भेसळ नसलेली हिंदी बोलणारा श्यामभाई, आम्ही मार्केटिंग वाल्यांच्या सवयी प्रमाणे त्याचे आणि त्या रिक्षा वाल्याचे इकडचे तिकडचे बोलणे सुरू झाले, काय कुठले,कशासाठी आपले नेहमीचे प्रश्न आणि त्यांची नेहमीचीच उत्तरे. 

रिक्षा वाल्याला त्यातून कळले की आम्ही ऑफिस साठी मुंबईत आलोय, झाले ह्याच्यावरून त्या भय्या च्या मनाचा बांध फुटला आणि भडभडून बोलायला सुरुवात झाली, पहिलेच वाक्य " साब अपना गाव छोडके क्यूँ आये इधर, थोडा कम पैसा मिलेगा तो भी चलेगा,मगर अपने गाव मे काम करो, मगर इधर नही". यायला भैय्याचे वाक्य ऐकून डोकेच फिरले, हा गडी यूपी वरून इथे महाराष्ट्रात येऊन काम करतोय,आणि आम्ही एक दिवसा साठी इकडे आलोय तर गडी आम्हाला लेक्चर देतोय. 

आम्ही दोघेही एकदमच त्याच्यावर चढलो, " क्या भैय्या,तुम इतना दूर से आके इधर काम कर रहे हो, और हमको बोल रहे हो ,इधर मत आना." येवढे म्हणायचा अवकाश गडी एकदम भाऊक होऊन बोलायला लागला,"अरे हमको ही पता है, हम यहा कैसे रह रहे हैं, अरे बच्चो की याद आती है, मां - बाबुजी कि फिकर रहती है, घरवाली क्या और कैसे संभालती होगी सब,चिंता होती है,मगर कुछ नही कर सकते,साल के पहले किसी का मुंह दिखता नहीं है,कभी जाना भी होता है तो आणे जने का टाइम छोडके मुश्किल से २/३ दिन मिलते है, उसमे क्या देखेंगे,क्या मिलेंगे और क्या बात करेंगे बोलो.भैय्या इधर रहे तो उधर की चिंता, उधर रहे तो यहा की चिंता,अरे जिंदगी जी नहीं सकते,सिर्फ कमाओ और पेट पालो,२००३ से आया हुं इधर २३ साल हो गए साब,आजभी अटका पड़ा हुं,वापस जाने की अभी उम्मीद ही नहीं रही,ऐसा ये चक्रव्यूह में अटक गया हूं भैय्या,जिनके लिए कर रहा हूं वो दिखते नही,सिर्फ इतना है फैमिली को कूछ अच्छा मिल रहा है ये तस्सली बोलके रात में सब को याद करके सो जाता हूं,दूसरे दिन के लिए. इसलिए आपको बोला,कुछ गलत बोला तो माफ करना".

येवढे बोलुन भय्या थांबला,आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत होतो,काय बोलावे ते सुचत नव्हते, तेवढ्यात ऑफिस आले,आम्ही काहीतरी थातूरमातूर बोलून भैय्या ला सोडले,आणि ऑफिस मध्ये शिरलो,पण डोक्यातून भैय्या आणि त्याचे बोलणे काही जात नव्हते.

भैय्या खरेच बोलत होता की, आपण चार पैसे जास्त मिळावे म्हणून आपल्या लोकांना सोडून दूर कामाला येतो,पण त्या चार अधिकच्या पैशांसाठी मोलाचे काही गमवून तर नाही ना बसत? हा विचार व्हायला हवा खरा,ठीक आहे परिस्थितीने काही गोष्टी कराव्या लागतात,तिथे पर्याय नसतो,जसे कि तो रिक्षा वाला भय्या,पण सगळ्यांच्याच बाबतीत असे नसावे , नाही का? बरेचसे लोक फक्त पैसा जास्त मिळतो म्हणून दूर जातात, राहतातही,त्यांच्या मनात हे असे भैय्या सारखे विचार येत नसतील का कधी? त्यांच्या नाही तर त्यांच्या परिवारातील लोकांच्या तरी मनात असे विचार येत असतील का? वाटत असेल का त्या भैय्या ला की,परिवारातल्या कोणी सदस्याने म्हणावे,आम्ही थोडी जबाबदारी उचलतो किवां आहे त्यात आपण सुखाने राहू पण एकत्र राहू,वेगळे असे दूर नको,तुम्ही असे दूर जाऊ,राहू नका आम्हाला सोडून. 

खरंच अशी कित्येक लोक असतील जे असे कोणी त्यांना म्हणायची वाट बघत असतील की राहूदे नको आम्हाला काही पण तू परत ये आमच्या जवळ, किवा त्यांचा परिवारातील सदस्य असतील ज्यांना ओरडुन सांगावे वाटत असेल,की बस आता,नको तो तुमचा अधिकचा पैसा,पण तुम्ही आमच्या बरोबर रहा....

अगतिकता की हव्यास, त्याचा की परिवाराचा??? तुमच्या प्रतिक्रिया महत्वाच्या......

आशुतोष दंडगव्हाळ...

Sunday, March 19, 2023

सहज आपले एक मनात आलेले विचार ....

 


कामानिमित्त नेहमीच प्रवास होत असतो, प्रवासात अनेक प्रसंग येतात, खूप काही बघितल्या जाते, ऐकू येते. असेच कामानिमित्त प्रवासात असताना बघितलेला एक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करावा वाटला,म्हणून हे लिखाण....

लातूरला सकाळी कारने निघालो, सलग दीड-एकशे किलोमिटर ड्रायव्हिंग झाले म्हणून म्हटले थोडे थांबावे, म्हणून थांबलो होतो, चहा पिताना सहज आपले इकडे तिकडे पाहत होतो, रस्त्याच्या पलीकडे एक भटके कुत्रे एका कपड्याच्या तुकड्या बरोबर खेळताना पाहिले, तो एकट्याच त्या कपड्याच्या तुकड्याशी खेळत होता,अगदी मस्त मजेत,आनंदात एकटेच खेळत होता,मध्येच आजूबाजूला कोणी येतंय का बघून परत त्या तुकड्याला तोंडात धरून पळापळी करत होते, हवेने तो तुकडा हलायचा,त्याला वाटायचे तोही त्याचेशी खेळतोय, तो अजून त्याला जोरात धरून इकडे तिकडे पळा पळी करून, लोळालोली करून अगदी तल्लीन होऊन खेळत होता,स्वतःच्याच विश्वात रममाण होता, मजा येत होती, त्याचे ते तसे खेळणे बघून. त्याचे आजूबाजूला अजिबात लक्षात नव्हते, कोण बघतय किवा काय, काही नाही, त्याचे त्याचे खेळणे चालूच. इतक्यात तिथे इकडून तिकडून अजून एक २-३ कुत्री आली, तीही अशीच रस्त्यावरची. तीही त्याचे बरोबर त्याच्या खेळात सामिल झाली, थोड्यावेळ खेळले सगळे मिळून, आणि मग परत जिकडे तिकडे निघून गेली. हा आपला hero मात्र काही तिथून हलला नाही, एका कुत्र्या मागे थोडा गेला खरा, पण लगेच कपड्याची आठवण येऊन परत त्याच्या त्या कपड्याच्या तुकड्याकडे येऊन परत खेळणे सुरू.

आपला hero आणि बाकीची सगळी कुत्री भटकी, ना त्यांना घर ना मालक. मिळेल ते खायचे, नाही मिळाले तर उपाशी, जागा मिळेल तिथे झोपायचे, अशी ही सगळी, बेवारस रस्त्यावरची कुत्री.

माझ्या मनात मात्र त्या कुत्र्याला पाहून उगाच एक विचार आला, खरेच आपण पण ह्या कुत्र्यासारखे बेवारस होत चाललो आहोत का,कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या नाही, कोणी आले तर बोलायचे,खेळायचे,नाहीतर परत आपले आपले स्वतःशीच ,स्वतःतच राहायचे. एकटेच होत चाललोय का,आपल्यालाही असेच एकटेच ,स्वतःच स्वतःशी खेळावे लागेल का? कोणी आले बरोबर तर तेवढ्यापुरते सोबत,येण्याऱ्याची इच्छा संपली किवा त्याचे मन भरले की तो निघून जाणार, मग परत आपण एकटे.. कोणी सोबत राहिल वा असेल का...किती विचित्र परिस्थिती माणसाच्या आयुष्यात येऊन ठेपलिये....

छोटेखानी घराच्या,कुटुंबाच्या नादात म्हणा, अपेक्षा नको कोणाकडून च्या विचित्र कल्पनेत म्हणा, आपल्याला काय करायचे, आपला काय संबंध, उगाच ब्याद नको, अश्या आणि बरेचश्या गोष्टींमुळे आपण एकमेकांना पासून दूर होत चाललो आहोत काय?आपण बेवारस होत चाललोय की काय..... 

एक वेळ अशी ह्या कुत्र्यासारखे एकटे च खेळायची व राहायची वेळ आपल्यावर तर येणार नाही ना... विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा,हो की नाही... काय वाटते तुम्हाला....?

आशुतोष दंडगव्हाळ...


" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...