Saturday, October 30, 2021

"ताईचे घर"

दि.३०.१०.२१
" ताईचे घर "...
ताईचा संसार म्हणजे विंचवाच्या पाठीवरचे बिऱ्हाड म्हणता येईल,आज ह्या गावात तर दोन वर्षांनी दुसऱ्याच गावात.संसार तसा साधाच,खाऊन पिऊन सुखी,ना मागे काही उरणार ना उद्या साठी काही. पण जे होते त्यात सुख समाधान होते. आयुष्यात सगळ्याच गोष्टी कुठे मिळतात, एक असेल तर एक नाही. समर्थांनी म्हटलेच आहे ना " जगी सर्व सुखी असा कोण आहे,विचारे मना तूची शोधूनी पाहे". असो तर हा आपला काही विषय नाही,आपला विषय आहे ते ताईचे घर.
ताईचे घर कधी २ खोल्यांचे तर कधी ३ खोल्यांचे,कधी मिळालाच तर एकदम बंगला,तर कधी बंगल्याच्या गॅरेज मध्ये पण असलेले. कधी गुळगुळीत टाइल्स तर कधी शेणाची सारवण असलेली जमीन, कधी घरात पाणी,तर कधी मैलभर जाऊन पाणी आणायला लागायचे. कधी धो धो पाणी,तर कधी तांब्याभर पाणी सुद्धा विकत आणायला लागायचे. एकूण काय तर adjustment का काय म्हणतात ना त्याचे दुसरे नाव म्हणजे ताई आणि तिचे घर. तसे बघायला गेले तर नुसते घराच्या बाबतीतच काय,तिचे आयुष्यच एक adjustment आहे. प्रत्येक गोष्टीत तिला जुळऊन घेणेच नशिबी होते, आणि ते तिने विनातक्रार केलेही. तिला कधीच कुठल्याच गोष्टीची तक्रार नसायची, जे मिळाले ते ती स्वीकारून मोकळी व्हायची. हो पण जे मिळाले ते सुंदर आणि टापटीप मात्र तिनेच ठेवावे. कसेही घर मिळायचे ते ती इतक्या सुंदर पद्धतीने , टापटीपिने ठेवायची की घरी येणाऱ्या पाहुण्याला त्या घरात काही उणीव आहे हे समजायचे नाही, किंबहुना ती ते समजू द्यायची नाही,हे जास्त योग्य राहिल. तर अशी ही ताई आणि तिचे घर सदैव हसतमुख आणि घराचे दरवाजे चोवीस तास खुले येणाऱ्या जाणाऱ्या साठी.
ताईच्या घराचे वैशिष्ट हे की इथे न सांगता सवरता जरी कोणी आले तरी हसतमुख ताई आणि तिचे घर नेहमी स्वागतासाठी हजर असणार. अगदी रात्री बेरात्री आले तरी पुढच्या पंधराव्या मिनटाला गरमागरम जेवणाचे ताट येणाऱ्या समोर असायचे तेही हसऱ्या चेहऱ्याने आणि समोरच्याने न सांगता. ताईच्या घराला स्वतःचे असे काहीच नियम नव्हते किवां असले तरी ते येणाऱ्या पाहुण्यांसाठी कधीच नसायचे, पाहुण्यांना काय हवयं,त्यांना कसे पाहिजे,त्यांना काय आवडते त्यांच्या प्रमाणे ते ताईचे घर पाहुणे असेपर्यंत होऊन जायचे. आलेल्यांना सगळे सगळे द्यायसाठी,कुठे काही कमी नको ह्यासाठी ताईची खटपट असायची,स्वतः जमिनीवर झोपायची तयारी पण आलेल्यांना गादी मिळायला हवी. पाहुण्यांसाठी कुठलेच नियम ह्या घरात नव्हते, त्यामुळे प्रत्येक येणारा पाहुणा हा त्याला जसे वाटेल तसा राहू शकायचा,त्याला जे पाहिजे ते तो करू शकायचा,मनमोकळे राहू शकायचा. त्याला आपण दुसऱ्यांच्या घरी आहोत हे ह्या ताईच्या घरी कधीच जाणवायचे नाही,हे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य होते ताईच्या घराचे.
असे हे ताईचे घर आणि ताई. हे सगळे वाचून तुम्हाला पण असे कुठले घर आणि एखादी ताई नक्की आठवेल ह्याची मला नक्की खात्री आहे.
हो पण एक सांगायचे राहिले,ह्यातील जी ताई आहे ना तिला मात्र असे घर नाही मिळाले कधीच जिथे ती हक्काने जाऊन चार दिवस राहू शकेल तिला जसे वाटेल तसे,कुठलेही नियम नसणारे....

आशुतोष दंडगव्हाळ....

Tuesday, May 11, 2021

"खेळणी सांगे स्वभाव"

दि.१०/०५/२०२१
खेळणी सांगे स्वभाव...
लहानपण आणि खेळणी,घरात कोणी लहान असेल तर त्याचा खेळण्यांच्या ढीगभर पसारा घरात हा दिसतो,प्रत्येकजण त्याच्या परिस्थितीनुसार घरातल्या लहान मुलांसाठी काही ना काही खेळणी ही आणतोच.आपण प्रत्येक जण लहानपणी अश्याच कुठल्यान कुठल्या खेळण्यासोबत खेळले आहोत. सहज मनात आले की मी माझ्या वा इतरांच्या  खेळण्यांशी कसा खेळायचो. जे काही उत्तर मिळाले त्याने जरा गंमत यायला लागली ह्यात,  मग आजूबाजूला जी माझे बरोबर लहान मंडळी होती ती त्यांच्या खेळण्यांशी कशी खेळायची. आता हे सुचायला एक कारण असे झाले, मनात आले की माणूस लहानपणी त्याच्या खेळण्यांशी जसा खेळत असेल त्याच प्रमाणे त्याचा स्वभाव बनत असावा की काय? मग ह्यावर उपाय म्हणून पहिल्यांदा स्वतःलाच ताडून बघितले की आपण कसे खेळायचो,आणि आता कसा स्वभाव आहे आपला,काही साम्य आहे का त्यात?मग मी लहान असताना जी माझे बरोबरची बच्चे कंपनी होती ती कशी खेळायची आणि आता त्यांचे कसे स्वभाव आहेत ते बघितले, तेव्हा असे लक्षात आले की लहानपणी माणूस त्याच्या खेळण्यांशी जसे खेळतो तसाच त्याचा स्वभाव बनतो,तोच पुढे वाढतो,तयार होतो....

हो ह्याला काही अपवाद ही असू शकतात तोच स्वभाव तसाच होईल,राहील असेही नाही.मोठे झाले वर,अनुभवाने, लोकलाजेस्तव म्हणा,चांगले - वाईट, चूक - बरोबर समजण्याने स्वभावात बदल होऊ शकतो, होत असेल. पण मला तरीही वाटते की तो मूळ स्वभाव बदलत नसावा, भलेही तो वर वर दिसत नसेल पण सुप्तावस्थेत तो नेहमी तिथेच तसाच असेल वा असतो असेच मी म्हणेन. आता ही गोष्ट सगळेच लगेच कबूल करतील वा सगळ्यांना सरसकट लागू होईल असेही नाही, माझा तसा आग्रह ही नाही, शंभरात ऐंशी टक्के तरी ही गोष्ट खरी निघेल.

आता बघा हं,हे काही प्रकार, म्हणजे मला काय म्हणायचय ते तुमच्या लक्षात येईल. काही मुले लहानपणी आपली किवा इतरांची खेळणी खूप जपून,प्रेमाने खेळतात, खूप जपतात,जीव लावतात, ती खेळणी तुटली फुटली तर त्यांना खूप वाईट वाटते,रडतात, अगदी हळवे असतात आपल्या  किवा इतरांच्या खेळण्यांविषयी, जशी ती खेळणी सजिव च आहेत. हीच मंडळी मोठी झाल्यावर पण अशीच वागतात, फक्त खेळण्यांच्या जागी आता ह्यांच्या आयुष्यात सजिव माणसे असतात,त्या लोकांशी ते अगदी तसेच वागतात जशी ते लहानपणी त्यांच्या खेळण्यांशि खेळत असतात,प्रेमाने,जीव लावतात, मन जपतात, सांभाळतात.

दुसरा प्रकार एकदम ह्याच्या विरुद्ध,ही मुलं स्वतःची खेळणी काय किव्वा दुसऱ्यांची खेळणी काय इतक्या धसमुसळपणाने खेळतात,तोडतात - फोडतात,अजिबात काळजी घेत नाही,ही मुलं मोठेपणी पण अशीच वागतात,आपल्या वागण्याने,बोलण्याने समोरच्या माणसांचे मन दुखावल्या जातेय, तोडतोय ह्याचा अजिबात विचार करत नाही.बेधुंद वागतात.

तिसरा प्रकार - ही मुलं स्वतःची खेळणी खूप जपतात,दुसऱ्याला खेळायला देणार नाही. पण दुसऱ्यांकडे गेल्यावर त्यांची खेळणी कशीही वापरणार, अजिबात काळजी घेणार नाही,तोडता - फोडता कशी येईल हे बघणार. आता ही मंडळी मोठी झाल्यावर कशी वागतील बघा, ह्यांचे मन हे जपणार,त्याला कोणालाही मोडू देणार नाही, किवा ह्यांना कोणीही दुखावलेले ह्यांना चालत नाही.हो पण दुसऱ्यांच्या मनाचा हे लोक अजिबात विचार करणार नाही, आपल्या बोलण्याने,वागण्याने समोरच्याचे मन दुखावले जाईल,वाईट वाटेल ह्याचा अजिबात विचार न करता ही लोक वागतात. दुसऱ्यांच्या भावना कचरा,स्वतःच्या तेवढया महत्वाच्या.

अजून एक प्रकार,ही मुलं स्वतःची खेळणी दुसऱ्याला देणार नाही आणि दुसऱ्यांच्या खेळण्याला हात लावणार नाही. ही मुलं मोठी झाल्यावर तुझ तू, माझं मी जगणारी होतात. माझं तू मागायचे नाही,तुझं मी मागणार नाही.

भातुकलीत रस घेणारी एखादी मुलगी पुढे सुगृहिणी बनते , लहान पणी  सहज म्हणून खेळल्या जाणाऱ्या खेळात मोठेपणी पारंगत होणे, त्यात नाव कमावणे, किवा लहानपणी छंद म्हणून लावलेल्या गाण्याच्या क्लास मुळे पुढे समाजाला एक उत्तम गायक किवा गायिका मिळुन जावी,असेच खूप काही.

असे खूप प्रकार सांगू शकता येतील,जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृर्ती ह्या उक्तीप्रमाणे. हे मी आपले सहज अवतीभोवती असणाऱ्या माणसांचा अभ्यास करून जे मला आढळले ते लिहिले,ते बऱ्याच अंशी खरेही निघाले. तुम्हाला हा असा काही अनुभव आलाय का,ह्याबद्दल तुम्ही कधी विचार केलाय किवा कधी लक्ष दिलय का ह्याकडे?

तुम्ही म्हणाल काहीतरीच, असे कुठे असते का, कुठल्या शास्त्रज्ञाने असा शोध लावलाय, किवा कुठल्या मानसशास्त्राच्या पुस्तकात असे लिहिले आहे. तर ह्याचे उत्तर नाही, असे कुठे काही लिहिले नाहीये,मी असा कुठलाही ठाम दावा  करत नाहीये की असेच असणार,असेच असते वगैरे वगैरे.. प्रत्येकवेळी प्रत्येक गोष्ट गांभीर्याने च घेतली पाहिजे, पुरावे दिले पाहिजेत, असे कुठे लिहिलंय का? गंमत म्हणून पाहू की जरा ह्याकडे. सहज पडताळून बघायचे ,सुरुवात स्वतःपासून करा,नंतर बाकीच्यांकडे बघा, करता मग सुरुवात? नक्की सांगा तुम्हाला जर असेच काही आढळून आले तर,वाट बघतोय...

©️आशुतोष दंडगव्हाळ....

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...