Tuesday, March 13, 2018

" भाषा दरिद्रता "

भाषा
सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात महत्वाचे आणि पहिले काम, व्हॉटसअप उघडून बघणे ते मी करत होतो ( काही लोक अजुनही कराग्रे वसते लक्ष्मी किंवा अजून सकाळचे काही श्लोक म्हणतात सकाळी, अगदीच old-fashioned बुवा 😉) नेहमीप्रमाणे गुड मॉर्निंग चे आणि कुठल्या कुठल्या इंग्लिश सायंटिस्ट आणि सेंट्सची शुभ वचने आली होती. नाही म्हणायला एखाद् दुसरा स्वामी विवेकानंदांचा मेसेज असतो कधी कधी, पण खूप कमी.
प्रश्न असा की भारत भूमी संतांची, तत्ववेत्त्यांची भूमी, तिथे शुभ विचारांची, तत्वज्ञानाची काय कमी, मग आपल्याला इंग्लिश विचारवतांच्याच वचनांची काय गरज, इथे कितीतरी थोर संत महात्मे, विचारवंत होऊन गेले, आहेतही, मग आपल्याला इंग्लिश, युरोपियन, किंवा अजून तत्सम बाहेरच्या विचारवंतांची गरज का पडावी?  डोक्यात विचार चालू झाला, आणि थोडे आजुबाजुला बघायला सुरुवात केली, मी स्वतः जी पुस्तके वाचायला घेतली होती त्यातली 70% पुस्तके इंग्लिश लेखकांची होती, बाकीची आपल्याकडील. मग लेकीची शाळेतली पुस्तके उघडली तीही बरीचशी बाहेरच्या विद्यापीठातील, त्यात भारतातल्या विचारवंतांचे, किंवा संतांची उणीव प्रकर्षाने जाणवली. मुलीला शाळेत सोडल्यावर सहज शाळेच्या भिंतींवर लक्ष गेले. तिथेही इंग्रजी संतांचीच वचने दिसली.आम्ही शाळेत असताना शाळेतल्या भिंतींवर सर्व मराठी संत, विचारवंतांची वचने लिहिलेली असायची. तीच समजून घेता घेता आयुष्य कमी पडतेय, कधी कुठल्या बाहेरच्या विचारवंतांची गरजच पडली नाही.
 मग आत्ताच आपल्याला व्यक्त व्हायला, चांगल्या विचारांसाठी, किंवा इंग्रजी भाषेची, बाहेरच्या विचारवंतांची का गरज पडते? ह्याला कारणीभूत कोण? आपली शिक्षणपद्धती, आपले वाचन, आपली भाषा दरिद्रता, का आपल्या भाषेत व्यक्त होता न येणं? आपल्याला काही सांगायचे ते आपल्या भाषेत सांगता न येणं, का त्याला आपल्या भाषेत शब्दच नाहीयेत असे वाटणं, का आपल्या भाषेत सांगायची लाज वाटणे, काय काय कारण असावे? का असे व्हावे, साधे कोणासमोर प्रेम व्यक्त करायला इंग्रजी भाषेचा आधार घ्यावा वाटतो, मराठीत सांगितले तर ते प्रेम नसते का, त्याला किंमत राहत नाही का? आज खरंच आपण इंग्रजीच्या एवढ्या आहारी गेलोय की स्वतःच्या भाषेची , की स्वतःच्या भाषेत व्यक्त होण्याची, स्वत:च्या साधू संतांच्या वचनांची, तत्ववेत्त्यांची लाज वाटायला लागलीय की काय तेच कळत नाही.

आशुतोष दंडगव्हाळ...

1 comment:

  1. मनातील विचार अगअग योग्य शब्दात व्यक्त केले आहेत

    ReplyDelete

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...