Tuesday, April 14, 2026

हक्काचं घर आणि हक्काची माणसं…


दि. १४.०४.२०२६..

कधी कधी आपण ज्या घराला “आपलं” समजतो,
तेच घर एक दिवस पूर्णपणे परकं वाटायला लागतं…
आणि ज्या माणसांना “हक्काचं” मानतो,
त्यांच्या आयुष्यात आपल्यासाठी जागाच नसते…

जुनी लोकं नेहमी सांगायचे छोटेसे का होऊन हक्काचे घर हवे, तसे ते आपण करतोही,आजही कितीही काही कोणी म्हटले 
तरी प्रत्येकाचे स्वतःच्या घराचे स्वप्न हे असतेच आणि ते तो पूर्ण करायची जीवतोड प्रयत्न करतो, पण हे तर झाले आपले 
घराविषयी, पण मला सांगायचे ते दुसरे हक्काचे घर, जिथे आपण आपल्या ह्या हक्काच्या घरासारखेच feel करतो, कुठलाही 
आडपडदा, सोपस्कार तिथे नसतात,तोच जिव्हाळा,प्रेम आणि सगळे काही अगदी आपल्या घरासारखेच.
आपण सगळेच आयुष्यात दोन गोष्टींच्या शोधात असतो,एक असे हे  हक्काचं घर आणि दुसरी हक्काची माणसं.
आपण मनापासून विश्वास ठेवतो की,“हे ही घर माझंच आहे… इथे मला समजून घेतलं जाईल.”
आणि,“ही माणसं माझी आहेत… ही कधीच मला सोडून जाणार नाहीत.”पण आयुष्य प्रत्येक वेळी आपल्याला हवं तसं उत्तर 
देत नाही…ज्या घराला आपण “आपलं” समजत होतो,जिथे आपण आपलेपण शोधत होतो,
तेच घर एक दिवस इतकं परकं वाटायला लागतं…तिथे आपल्यासाठी जागा असते,पण आपुलकी नसते.आपण तिथे राहतो,पण कोणी आपल्या अस्तित्वाची दखलही घेत नाही,समजून घेत नाही.आपल्या भावना, आपल्या वेदना,सगळं काही त्या चार भिंतींमध्येच अडकून राहतं.तेव्हा कळतं, हे घर “हक्काचं” नव्हतंच कधी, ती फक्त एक राहण्याची जागा होती.
असेच काहीसे हक्काच्या माणसांबद्दल,हक्काची माणसं… की फक्त एक भास?
आपण काही माणसांना इतकं जवळचं मानतो,की त्यांच्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करवत नाही. 
आपल्याला वाटतं —“हा माणूस माझ्यासाठी आहे.”“काहीही झालं तरी, हा मला कधीच सोडून जाणार नाही.” आपण जसे 
आहोत तसे ते आपल्याला स्वीकारतील. आपण दुसरीकडे खूप matured वागतो, पण ह्या माणसां पुढे हट्ट करतो , इथे मॅच्युरिटी दाखवावी वाटत नाही,कुठेतरी वाटते की ह्या माणसांनी तो हट्ट पुरवावा, समजून घ्यावे. 
पण होते काहीतरी भलतेच, हिच लोक आपल्याला मूर्ख ठरवून, हळूहळू दूर जायला लागतात…त्यांच्या आयुष्यात आपण 
option असतो,priority कधीच नसतो हे जाणवते आणि कळते.
असं जाणवतं की त्यांच्या आयुष्यात आपल्याला कधीच, काहीच आणि कुठेच जागाच नव्हती.
घर परकं वाटणं दुखावतं,पण माणसं परकी होणं आतून तोडून टाकतं.
कारण आपण घरावर नाही,माणसांवर प्रेम केलेलं असतं.
विश्वास तुटतो,अपेक्षा कोसळतात,आणि आपण स्वतःलाच विचारतो ,“मी इथे स्वतःला एवढं मनापासून का जोडून घेतलं?”
“चूक माझीच होती का?” खरं सांगायचं तर,प्रत्येक घर आपलं नसतं…आणि प्रत्येक माणूस आपल्यासाठी नसतो.
कधी कधी आपण जिथे आपलेपण शोधतो,तिथे आपल्यासाठी काहीच नसतं,ना प्रेम, ना समज, ना जागा.
पण हे जेव्हा समजते तेव्हा आपण पूर्णपणे तुटलेले असतो,परत कधीही न सावरता येण्यासारखे,अशी जखम मिळते जी 
कधीच भरून येत नाही....

आशुतोष दंडगव्हाळ....
© 2026 Ashutosh Dandgavhal. All rights reserved.


8 comments:

  1. खरे आहे 👌

    ReplyDelete
  2. शिवाजी काकडे.April 14, 2026 at 6:58 PM

    एकदम मार्मिक लिखाण.
    पण कधी कधी....
    काही नात्यांना नाव नसते आणि काही नावापुरतीच असतात.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you, ho na kahi natyana naw dyaychi garaj naste, ti adhich strong astat, aani kahi nawe asale tari kamkuwat astat.

      Delete
  3. आपण आपल्याला जे शक्य आहे तेव्हढं करायचं. बाकी योग्य वेळी आपलं असणं किंवा नसणं समोरच्याला जाणवतंच. जे आहे ते छान आहे म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं. लेख वस्तुस्थिती दाखवतोय.

    ReplyDelete
    Replies
    1. ते शेवटी आलेच पण त्रास होतो तो होतोच.

      Delete

" तो फक्त हसत राहिला...आणि आतून तुटत गेला..."

दि.३०/०५/२०२६... आजकालच्या जगात माणसं खूप जोडली गेली आहेत… फोनमध्ये contacts वाढले, social media वर followers वाढले, गप्पा वाढल्या, status व...