दि.१०/०५/२०२१
खेळणी सांगे स्वभाव...
लहानपण आणि खेळणी,घरात कोणी लहान असेल तर त्याचा खेळण्यांच्या ढीगभर पसारा घरात हा दिसतो,प्रत्येकजण त्याच्या परिस्थितीनुसार घरातल्या लहान मुलांसाठी काही ना काही खेळणी ही आणतोच.आपण प्रत्येक जण लहानपणी अश्याच कुठल्यान कुठल्या खेळण्यासोबत खेळले आहोत. सहज मनात आले की मी माझ्या वा इतरांच्या खेळण्यांशी कसा खेळायचो. जे काही उत्तर मिळाले त्याने जरा गंमत यायला लागली ह्यात, मग आजूबाजूला जी माझे बरोबर लहान मंडळी होती ती त्यांच्या खेळण्यांशी कशी खेळायची. आता हे सुचायला एक कारण असे झाले, मनात आले की माणूस लहानपणी त्याच्या खेळण्यांशी जसा खेळत असेल त्याच प्रमाणे त्याचा स्वभाव बनत असावा की काय? मग ह्यावर उपाय म्हणून पहिल्यांदा स्वतःलाच ताडून बघितले की आपण कसे खेळायचो,आणि आता कसा स्वभाव आहे आपला,काही साम्य आहे का त्यात?मग मी लहान असताना जी माझे बरोबरची बच्चे कंपनी होती ती कशी खेळायची आणि आता त्यांचे कसे स्वभाव आहेत ते बघितले, तेव्हा असे लक्षात आले की लहानपणी माणूस त्याच्या खेळण्यांशी जसे खेळतो तसाच त्याचा स्वभाव बनतो,तोच पुढे वाढतो,तयार होतो....
हो ह्याला काही अपवाद ही असू शकतात तोच स्वभाव तसाच होईल,राहील असेही नाही.मोठे झाले वर,अनुभवाने, लोकलाजेस्तव म्हणा,चांगले - वाईट, चूक - बरोबर समजण्याने स्वभावात बदल होऊ शकतो, होत असेल. पण मला तरीही वाटते की तो मूळ स्वभाव बदलत नसावा, भलेही तो वर वर दिसत नसेल पण सुप्तावस्थेत तो नेहमी तिथेच तसाच असेल वा असतो असेच मी म्हणेन. आता ही गोष्ट सगळेच लगेच कबूल करतील वा सगळ्यांना सरसकट लागू होईल असेही नाही, माझा तसा आग्रह ही नाही, शंभरात ऐंशी टक्के तरी ही गोष्ट खरी निघेल.
आता बघा हं,हे काही प्रकार, म्हणजे मला काय म्हणायचय ते तुमच्या लक्षात येईल. काही मुले लहानपणी आपली किवा इतरांची खेळणी खूप जपून,प्रेमाने खेळतात, खूप जपतात,जीव लावतात, ती खेळणी तुटली फुटली तर त्यांना खूप वाईट वाटते,रडतात, अगदी हळवे असतात आपल्या किवा इतरांच्या खेळण्यांविषयी, जशी ती खेळणी सजिव च आहेत. हीच मंडळी मोठी झाल्यावर पण अशीच वागतात, फक्त खेळण्यांच्या जागी आता ह्यांच्या आयुष्यात सजिव माणसे असतात,त्या लोकांशी ते अगदी तसेच वागतात जशी ते लहानपणी त्यांच्या खेळण्यांशि खेळत असतात,प्रेमाने,जीव लावतात, मन जपतात, सांभाळतात.
दुसरा प्रकार एकदम ह्याच्या विरुद्ध,ही मुलं स्वतःची खेळणी काय किव्वा दुसऱ्यांची खेळणी काय इतक्या धसमुसळपणाने खेळतात,तोडतात - फोडतात,अजिबात काळजी घेत नाही,ही मुलं मोठेपणी पण अशीच वागतात,आपल्या वागण्याने,बोलण्याने समोरच्या माणसांचे मन दुखावल्या जातेय, तोडतोय ह्याचा अजिबात विचार करत नाही.बेधुंद वागतात.
तिसरा प्रकार - ही मुलं स्वतःची खेळणी खूप जपतात,दुसऱ्याला खेळायला देणार नाही. पण दुसऱ्यांकडे गेल्यावर त्यांची खेळणी कशीही वापरणार, अजिबात काळजी घेणार नाही,तोडता - फोडता कशी येईल हे बघणार. आता ही मंडळी मोठी झाल्यावर कशी वागतील बघा, ह्यांचे मन हे जपणार,त्याला कोणालाही मोडू देणार नाही, किवा ह्यांना कोणीही दुखावलेले ह्यांना चालत नाही.हो पण दुसऱ्यांच्या मनाचा हे लोक अजिबात विचार करणार नाही, आपल्या बोलण्याने,वागण्याने समोरच्याचे मन दुखावले जाईल,वाईट वाटेल ह्याचा अजिबात विचार न करता ही लोक वागतात. दुसऱ्यांच्या भावना कचरा,स्वतःच्या तेवढया महत्वाच्या.
अजून एक प्रकार,ही मुलं स्वतःची खेळणी दुसऱ्याला देणार नाही आणि दुसऱ्यांच्या खेळण्याला हात लावणार नाही. ही मुलं मोठी झाल्यावर तुझ तू, माझं मी जगणारी होतात. माझं तू मागायचे नाही,तुझं मी मागणार नाही.
भातुकलीत रस घेणारी एखादी मुलगी पुढे सुगृहिणी बनते , लहान पणी सहज म्हणून खेळल्या जाणाऱ्या खेळात मोठेपणी पारंगत होणे, त्यात नाव कमावणे, किवा लहानपणी छंद म्हणून लावलेल्या गाण्याच्या क्लास मुळे पुढे समाजाला एक उत्तम गायक किवा गायिका मिळुन जावी,असेच खूप काही.
असे खूप प्रकार सांगू शकता येतील,जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृर्ती ह्या उक्तीप्रमाणे. हे मी आपले सहज अवतीभोवती असणाऱ्या माणसांचा अभ्यास करून जे मला आढळले ते लिहिले,ते बऱ्याच अंशी खरेही निघाले. तुम्हाला हा असा काही अनुभव आलाय का,ह्याबद्दल तुम्ही कधी विचार केलाय किवा कधी लक्ष दिलय का ह्याकडे?
तुम्ही म्हणाल काहीतरीच, असे कुठे असते का, कुठल्या शास्त्रज्ञाने असा शोध लावलाय, किवा कुठल्या मानसशास्त्राच्या पुस्तकात असे लिहिले आहे. तर ह्याचे उत्तर नाही, असे कुठे काही लिहिले नाहीये,मी असा कुठलाही ठाम दावा करत नाहीये की असेच असणार,असेच असते वगैरे वगैरे.. प्रत्येकवेळी प्रत्येक गोष्ट गांभीर्याने च घेतली पाहिजे, पुरावे दिले पाहिजेत, असे कुठे लिहिलंय का? गंमत म्हणून पाहू की जरा ह्याकडे. सहज पडताळून बघायचे ,सुरुवात स्वतःपासून करा,नंतर बाकीच्यांकडे बघा, करता मग सुरुवात? नक्की सांगा तुम्हाला जर असेच काही आढळून आले तर,वाट बघतोय...
©️आशुतोष दंडगव्हाळ....
एकदम बरोबर. 'बाळाचे पाय पाळण्यात!'.
ReplyDeleteस्वभाव, आणि व्यक्तिमत्व ह्या दोन्हीची पायाभरणी बालपणीच होते.
व्यक्ति म्हणुन थोडे बदल काळानुरुप होत जातात. पण स्वभाव मात्र सहसा बदलत नाही.
लहानपणी 'रडी'चा डाव न खेळणारा मुलगा मोठेपणी अवघड समस्यांना सुद्धा खेळाडू वृत्तीने सामोरा जातो. लहान भावंडांना मायेने खेळवणारी तायडी पुढील आयुष्यात बहुधा समाधानी असते.
म्हणतात ना,
'स्वभावो नोपदेशेन शक्यते कर्तुमन्यथा
सुतप्तमपि पानीयं पुनर्गच्छति शीतताम्.'
पाहिलं तर खेळणी तीच, पण प्रत्येक बाळाचं हाताळणं, सांभाळणं किती निराळं?
मस्त लेख, छान आशय.
सही, मला नक्की काय म्हणायचे ते बरोबर कळले👌🏻👍🏻👏🏻👏🏻
DeleteHi! Ashu
ReplyDeleteNice Subject loved it
My son still has & is very protective with
His toys
very protective with
😊
Delete